BJP to appoint women mini mayor in 8 municipal zones : सत्ताधाऱ्यांकडून महिला सक्षमीकरणाचा संदेश, ‘मीनी महापौरां’ची नावे निश्चित
Nagpur आगामी निवडणुकांचे वारे वाहत असताना आणि केंद्र सरकारने महिला आरक्षणाचे विधेयक मंजूर करण्याच्या हालचाली वेगवान केल्या असतानाच, नागपूर भाजपच्या वतीने स्थानिक पातळीवर महिला सक्षमीकरणाचा मोठा संदेश देण्यात आला आहे. नागपूर महानगरपालिकेची सत्ता हाती आल्यापासून भाजपने महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती अध्यक्षपदासह सर्व महत्त्वाची पदे महिलांकडे सोपवली होती.
आता त्याच पावलावर पाऊल टाकत, ‘मिनी महापौर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झोन समितीच्या सभापतीपदी देखील भाजपने महिलांनाच संधी दिली असून भाजपचे बहुमत असलेल्या सर्व आठही झोनमध्ये महिलांची नामांकने दाखल करण्यात आली आहेत.
Raj thackeray : ‘ही आगीशी खेळण्यासारखी परिस्थिती’ राज ठाकरे यांचा केंद्र सरकारला इशारा
भाजपने आपल्या या निर्णयाद्वारे ‘मातृशक्ती वंदन’ अभियानाची अंमलबजावणी स्थानिक स्वराज्य संस्थांपासून सुरू केल्याचे चित्र आहे. यामध्ये लक्ष्मीनगर झोनमधून लक्ष्मी यादव, धरमपेठ झोनमधून धनश्री देशपांडे, हनुमाननगर झोनमधून ज्योती देवघरे आणि धंतोली झोनमधून भारती बुंदे यांची वर्णी लागली आहे.
तसेच नेहरूनगर झोनसाठी सीमा ढोमने, गांधीबाग झोनसाठी उमा देशमुख, सतरंजीपुरा झोनसाठी अभिरुची राजगिरे आणि लकडगंज झोनसाठी महेश्वरी बिसेन यांनी आपली नामांकने दाखल केली असून, यामुळे महापालिकेच्या इतिहासात प्रथमच सर्व प्रमुख पदे महिलांच्या ताब्यात गेली आहेत.
Navneet Rana : नवनीत राणांना दंगली घडवायच्या आहेत, त्यांना पक्षातून बाहेर काढा
भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी या निर्णयाचे स्वागत करताना म्हटले आहे की, भारतीय जनता पक्षाने नागपूर महापालिकेत ‘शतप्रतिशत’ महिला शक्तीला प्राधान्य देण्याचा आपला संकल्प पूर्ण केला आहे. जनतेला दिलेला शब्द पाळत भाजपने आपल्या ताब्यातील सर्व आठही झोनमध्ये महिला नेतृत्वाला संधी देऊन महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.
यामुळे स्थानिक प्रशासनात महिलांचा सहभाग आणि प्रभाव अधिक वाढणार असून, आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी ही भाजपची मोठी राजकीय खेळी मानली जात आहे.








