Chairman of the State Minority Commission Pyare khan slammed Navneet Rana, demanding her expulsion from the party : राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांचा घणाघात
Nagpur अमरावतीमध्ये एका मुस्लिम युवकाने अनेक मुलींसोबत प्रेमसंबंध जुळवून त्यांचे खाजगी रिल्स व्हायरल केल्याच्या प्रकरणाला आता तीव्र राजकीय वळण लागले आहे. या गंभीर गुन्हेगारी घटनेत धार्मिक रंग भरून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा करत असल्याचा खळबळजनक आरोप राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी केला आहे. नवनीत राणा यांना केवळ राजकीय स्टंटबाजी करायची असून राज्यात दंगली घडवण्याचा त्यांचा डाव आहे, अशा शब्दात खान यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना तोफ डागली.
या प्रकरणाची दखल घेत अल्पसंख्याक आयोगाने आपले एक विशेष पथक परतवाडा येथे पाठवले होते. अमरावतीचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि पोलीस आयुक्त राकेश ओला यांना अफवा पसरवणाऱ्या नेत्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अफवा पसरवणारा नेता कितीही मोठा असला तरी त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा, अशी भूमिका प्यारे खान यांनी मांडली आहे. नवनीत राणा अमरावतीत असताना त्यांना या प्रकरणाची माहिती कशी काय कळाली नाही? आता केवळ प्रसिद्धीसाठी त्या या विषयाचा बाजार मांडत आहेत. त्यांच्यावर पोक्सो अंतर्गत कारवाई व्हावी अशी मागणी माझ्याकडे आली आहे, असेही खान यांनी यावेळी नमूद केले.
या प्रकरणावरून प्यारे खान यांनी थेट भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे धाव घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून नवनीत राणा यांची तातडीने पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. “हे देवेंद्र फडणवीस यांचे महाराष्ट्र आहे, येथे विकास थांबवण्यासाठी जे लोक प्रयत्न करतील, त्यांच्यावर कारवाई होईल,” असा इशाराही त्यांनी दिला.
या घटनेत कोणताही धार्मिक अँगल नसल्याचे स्पष्ट करत प्यारे खान म्हणाले की, संबंधित आरोपी युवकावर मुस्लिम समाजाने पूर्णपणे बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या गुन्ह्यात आरोपीला पाठीशी घालणाऱ्या किंवा त्याच्यासोबत फोटो काढणाऱ्या पोलिसांवरही निलंबनाची कारवाई झाली पाहिजे. केवळ स्वतःच्या रिल्स आणि प्रसिद्धीसाठी एका गंभीर प्रकरणाला धार्मिक वळण देणाऱ्या नवनीत राणा यांच्या भूमिकेमुळे आता महायुतीमध्येच नवा वाद उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.








