Major Reshuffle by Sharad Pawar in Nagpur; Salil Deshmukh Appointed District President, Pravin Kunte Named State General Secretary : नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत सलील देशमुखांच्या नेतृत्वाची लागणार कसोटी
Nagpur : विधानसभा आणि त्यानंतरच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये अपयश आल्यानंतर, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आता नागपूर जिल्ह्यात संघटनात्मक बदलांचे मोठे पाऊल उचलले आहे. पक्षाने नागपूर जिल्ह्याची संपूर्ण जबाबदारी आता युवा नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांच्यावर सोपवण्याचा निर्णय घेतला असून, जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांच्या नावाची घोषणा लवकरच केली जाणार आहे.
तत्पूर्वी, मावळते जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे पाटील यांनी यापूर्वीच आपल्याला जिल्ह्याच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती पक्षाच्या बैठकीत केली होती. त्यांच्याकडे आता पुन्हा प्रदेश प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवून संघटनेत प्रदेश सरचिटणीस म्हणून नवी नियुक्ती करण्यात आली आहे.
सलील देशमुख यांनी काटोल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढली होती. सुमारे अडीच दशक या मतदारसंघाचे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिनिधित्व केले होते. मात्र २०२४ च्या निवडणुकीत पक्षाने अनिल देशमुखांना विदर्भाचे नेते करून सलील देशमुख यांना उमेदवारी दिली होती. तत्पूर्वी, ईडीच्या (ED) कारवाईमुळे अनिल देशमुख जेव्हा अडचणीत होते, तेव्हा हा मतदारसंघ सलील यांनीच सांभाळला होता. परंतु, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत सलील देशमुख यांना वडिलांचा हा पारंपरिक मतदारसंघ राखण्यात यश आले नाही. सलील देशमुख हे प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये अत्यंत सक्रिय होते आणि त्यांनी राज्याचे उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे.
दरम्यान, नगरपालिका निवडणुकीच्या काळात जागावाटप आणि आघाड्यांवरून त्यांचे पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाशी खटकले होते. त्या निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी तब्येतीचे कारण पुढे करत राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. त्यावेळी ते कुठल्या दुसऱ्या पक्षात जातील अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या; मात्र पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांची समजूत काढली. त्यानंतर देशमुख यांनी या सर्व अफवा असल्याचे सांगून पक्षांतराच्या बातम्या फेटाळून लावल्या होत्या. आता सलील देशमुख यांच्या जिल्हाध्यक्षपदावरील नियुक्तीमुळे नागपूर ग्रामीण भागातील युवकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये नवे चैतन्य निर्माण होणार आहे.
HC slams police : ‘भाजप मुर्दाबाद’च्या घोषणांवरून तडीपार करता येणार नाही
राजकीय घडामोडींचा विचार केला तर उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीत सहभागी झाल्यानंतरही देशमुख कुटुंब शरद पवार यांच्यासोबत कायम राहिले. वर्धा लोकसभेची उमेदवारी खासदार अमर काळे यांना मिळवून देण्यात अनिल देशमुख यांचा मोठा वाटा होता. त्यांनी भाजपचे दोन टर्मचे खासदार रामदास तडस यांच्यावर मातही केली होती. पक्षात मोठी फूट पडल्यानंतर अमर काळे यांनी लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला विदर्भात खाते उघडून दिले होते. मात्र, त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत पवारांच्या राष्ट्रवादीचा नागपूर जिल्ह्यात एकही उमेदवार निवडून आला नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर तत्कालीन जिल्हाध्यक्ष बाबा गुजर हे अजित पवारांसोबत गेले होते, ज्यांच्या जागी पक्षाने पुन्हा एकदा प्रवीण कुंटे यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती. आता आगामी काळात सलील देशमुख यांच्या नेतृत्वात नागपूर जिल्हा परिषदेची निवडणूक होणार असून, ही निवडणूक त्यांच्या राजकीय कौशल्याची आणि नेतृत्वाची मोठी परीक्षा असणार आहे.








