व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home ताज्या बातम्या १९० गावांतील सुमारे १ लाख ७५ हजार नागरिकांचा प्रश्न; चंद्रपूर जिल्ह्यातील बंद...

१९० गावांतील सुमारे १ लाख ७५ हजार नागरिकांचा प्रश्न; चंद्रपूर जिल्ह्यातील बंद पाणीपुरवठा योजनांसाठी मुनगंटीवारांचा पुढाकार

मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन; थकीत वीजबिल माफीबाबत सरकारने दिला शब्द, मुख्य सचिवांसोबत चर्चा

Chandrapur दुष्काळसदृश परिस्थितीत ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये, यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील थकीत वीजबिलांमुळे बंद पडलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचा प्रश्न शासनदरबारी उपस्थित केला आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करून बंद पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करण्याची आणि थकीत वीजबिलांचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली.

याच विषयावर आ. मुनगंटीवार यांनी महाराष्ट्राचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. या चर्चेदरम्यान मुख्य सचिवांनी सकारात्मक प्रतिसाद देत थकीत वीजबिल माफ करण्याबाबत आश्वासन दिले. त्यामुळे जिल्ह्यातील १३ बंद प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांवर अवलंबून असलेल्या सुमारे १९० गावांतील १ लाख ७५ हजार नागरिकांना दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

भाजपमध्ये कोडवते दाम्पत्याची राजकीय कसोटी; पदे मिळाली, आता संधीची प्रतीक्षा!

चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हा परिषद व शिखर समितीमार्फत एकूण ३३ प्रादेशिक पाणीपुरवठा योजना चालविल्या जातात. त्यापैकी २० योजनांद्वारे सध्या पाणीपुरवठा सुरू असून, उर्वरित १३ योजना सुमारे ४ कोटी ९२ लाख ६८ हजार रुपयांची वीजदेयके थकीत असल्यामुळे बंद आहेत. दुष्काळसदृश परिस्थितीत पाण्याचे स्रोत आटत असताना या योजनांचा वीजपुरवठा खंडित झाल्याने संबंधित गावांतील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा व्हावा, यासाठी या योजनांची थकीत वीजदेयके दुष्काळ निवारण अथवा टंचाई निधीतून अदा करण्याची आवश्यकता आ. मुनगंटीवार यांनी अधोरेखित केली. सन २०१८ मधील दुष्काळजन्य परिस्थितीत ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजनांची विद्युत देयके टंचाई निधीतून अदा करण्याबाबत शासनाने निर्देश दिले होते. त्याच धर्तीवर सध्याच्या परिस्थितीतही शासनाने तातडीने निर्णय घेऊन बंद योजना पुन्हा सुरू करण्यासाठी कार्यवाही करावी, अशी मागणी आ. मुनगंटीवार यांनी फडणवीस यांच्याकडे केली आहे.

पिण्याचे पाणी ही नागरिकांची मूलभूत गरज आहे. थकीत वीजबिलांमुळे ग्रामीण जनतेला या सुविधेपासून वंचित राहावे लागू नये, ही या पाठपुराव्यामागील आ.मुनगंटीवार यांची भूमिका आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांना सादर केलेले निवेदन आणि मुख्य सचिव राजेशजी अग्रवाल यांच्याशी झालेली चर्चा यामुळे हा प्रश्न शासनस्तरावर मार्गी लागण्याच्या दृष्टीने पुढाकार घेण्यात आला आहे.

दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; मुनगंटीवारांची आक्रमक भूमिका

आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे मुख्य सचिवांनी थकीत वीजबिल माफ करण्याबाबत सकारात्मक आश्वासन दिले आहे. या आश्वासनाची अंमलबजावणी होऊन संबंधित १३ पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा पूर्ववत झाल्यास चंद्रपूर जिल्ह्यातील १९० गावांमधील सुमारे १ लाख ७५ हजार नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकेल. दुष्काळाच्या कठीण काळात ग्रामीण जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये, यासाठी आ. मुनगंटीवार यांनी हा प्रश्न शासनदरबारी लावून धरला असून, आता शासनाच्या पुढील निर्णयाकडे चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!