An appeal to Manoj Jarange not to hold protests during the Ganeshotsav period : अकरा दिवसानंतरही मागण्या मांडता येतील, माजी खासादाराचा सल्ला
Amravati मराठा आरक्षणाची मागणी पुन्हा एकदा गाजत असताना, आंदोलनकर्ते मनोज जरांगे आणि त्यांचे समर्थक मुंबईकडे निघाले आहेत. या पार्श्वभूमीवर समर्थन आणि विरोधाचे सूर उमटत आहेत. भाजप नेत्या आणि अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी या आंदोलनाबाबत प्रतिक्रिया देत गणेशोत्सव काळात आंदोलन टाळावे, असे मत व्यक्त केले आहे.
राणा म्हणाल्या, “न्यायालयावर सर्वांचा विश्वास आहे आणि न्यायालयाच्या आदेशांचे पालन सर्वांनी केले पाहिजे. गणेशोत्सव हा हिंदू समाजाचा मोठा सण आहे. महाराष्ट्रात भक्तीभावाचे वातावरण आहे. या दिवसांत मुंबईत देशभरातून लाखो भाविक लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी येतात. त्यामुळे गर्दी प्रचंड असते. म्हणून या अकरा दिवसांत आंदोलन न करता, उत्सवानंतर मागण्या पुढे न्याव्यात,” असे त्यांनी सांगितले.
त्या पुढे म्हणाल्या, “मनोज जरांगे आणि त्यांच्या समर्थकांनी या सणात विघ्न आणू नये. अकरा दिवसानंतरही मागणी करता येईल. कोण हिंदुत्ववादी आहे हे ठरवण्याचा अधिकार कुणालाच नाही. मात्र हिंदूंचे सण निर्विघ्न पार पडावेत, एवढीच अपेक्षा आहे.”
Anil Deshmukh : अमेरिकेच्या टेरीफचा कापुस उत्पादकांना फटका !
दरम्यान, मनोज जरांगे यांनी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. सुरुवातीला न्यायालय आणि पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तरीदेखील आंदोलनासाठी मुंबईत जाण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला होता. यासोबतच, मराठा समाज संघटनेने प्रसिद्धीपत्रक जारी करत आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. “मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मुंबई सोडणार नाही,” असा संकल्प विदर्भातील मराठा बांधवांनी केला आहे. या आंदोलनासाठी लाखो मराठा मुंबईकडे रवाना होणार आहेत. तसेच हैदराबाद गॅझेट लागू करणे, अण्णासाहेब पाटील महामंडळासाठी दोन हजार कोटींचा निधी मंजूर करणे अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत.