Allegations of illegal operations by coaching classes in Nagpur; the Nationalist Congress Party issues an ultimatum to the Municipal Commissioner : शहरातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी खेळणारा कोचिंग क्लासेसचा अवैध कारभार तातडीने थांबविण्याची मागणी
Nagpur नागपूर शहरात छुप्या आणि बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या कोचिंग क्लासेसच्या अनधिकृत व धोकादायक कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने थेट रणशिंग फुंकले आहे. शहरातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी खेळणारा कोचिंग क्लासेसचा अवैध कारभार तातडीने थांबवावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा थेट अल्टीमेटम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश प्रवक्ते प्रशांत पवार आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे नागपूर शहर अध्यक्ष मुन्ना तिवारी यांनी दिला आहे. या संदर्भात त्यांनी नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.
नागपूर हे मध्य भारतातील शिक्षणाचे मोठे केंद्र बनले असून, येथे हजारो विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी कोचिंग आणि ट्युशन क्लासेसमध्ये शिक्षण घेत आहेत. मात्र, बहुतांश क्लासेस हे अत्यंत दाटीवाटीच्या ठिकाणी, अपुऱ्या जागेत आणि नियमांना हरताळ फासून चालवले जात असून देशातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये घडलेल्या भीषण दुर्घटनांची पार्श्वभूमी लक्षात घेता नागपुरातील विद्यार्थ्यांची सुरक्षा हीच सर्वोच्च प्राथमिकता असली पाहिजे, याकडे शिष्टमंडळाने मनपा आयुक्तांचे तीव्रतेने लक्ष वेधले.
राष्ट्रवादी काँग्रेसने प्रशासनाकडे अत्यंत आक्रमक मागण्या मांडल्या असून यामध्ये शहरातील सर्व कोचिंग क्लासेसकडे अग्निशमन दलाचे नाहरकत प्रमाणपत्र आहे की नाही, याची तातडीने तपासणी करण्याची मागणी केली आहे.
तसेच संबंधित इमारतीची सुरक्षा, वीज जोडणीची सुरक्षितता, आपत्कालीन निर्गमन मार्ग आणि आवश्यक परवानग्या या सर्व कायदेशीर बाबींचे सखोल ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी लावून धरली आहे. नियमांचे सर्रास उल्लंघन करून आणि विनापरवाना अवैधपणे चालणाऱ्या क्लासेसवर तात्काळ टाळे ठोकून कठोर कायदेशीर कारवाई करावी आणि कोचिंग क्लासेसच्या नियमित सुरक्षिततेची तपासणी करण्यासाठी मनपाने एक कायमस्वरूपी ‘सेफ्टी ऑडिट’ यंत्रणा लागू करावी, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
या प्रसंगी माजी नगरसेवक तानाजी वनवे, माजी नगरसेवक राजेश माटे, लक्ष्मीकांत पांडे, मोंटी गुंडेचा, जगदीश पंचबुद्धे, संकेत नागपूरकर, गजेंद्र सिंह राठोड, बीरू सिंह तोमर, हिमांशु लांडगे, राम चारडे, अनुराग सोनोने, जय वुलबुले, रुदंत सोनवणे, हर्ष मोरांडे आणि महादेवराव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मनपा प्रशासनाने तातडीने विशेष मोहीम राबवून या अवैध संस्थांची चौकशी व तपासणी न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा सज्जड इशाराही यावेळी पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.








