व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Vishwas nangre patil : गुन्हेगार कमी झालेत का, जो आशा स्वयंसेविकांवर गुन्हे...

Vishwas nangre patil : गुन्हेगार कमी झालेत का, जो आशा स्वयंसेविकांवर गुन्हे दाखल करायला, पोलीस आयुक्त नागरे पाटलांचा संतप्त सवाल

Vishwas Nangare Patil pulls up officials over the registration of criminal cases against ASHA volunteers : आशा गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने नागपुरातील संविधान चौकात हजारो आशा स्वयंसेविकांची निदर्शने

Nagpur शहरात गुन्हेगार कमी झालेत का, जो निवडणूक कामाला नकार दिला म्हणून आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांवर गुन्हे दाखल करायला, मला आधी या प्रकरणाची माहिती घेऊ द्या, मी तुम्हाला कळवतो, अशा कडक शब्दांत नागपूरचे पोलीस आयुक्त नागरे पाटील यांनी स्थानिक प्रशासनाला फटकारले आहे.

निवडणूक आणि ‘बीएलओ’ (BLO) कामाच्या सक्तीविरोधात ‘आयटक’ (AITUC) संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने आज नागपुरातील संविधान चौकात हजारो आशा आणि गटप्रवर्तकांनी कॉ. श्याम काळे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने केली. या आंदोलनादरम्यान पोलीस आयुक्तांनी आंदोलकांच्या शिष्टमंडळाला हे सकारात्मक आश्वासन दिले.

आरोग्य विभागाच्या वरिष्ठ आयुक्तांनी आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना निवडणूक कामे देऊ नका, हे त्यांचे काम नाही, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. असे असतानाही नागपूरचे जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशा व अंगणवाडी सेविकांना धमकावून, दबावतंत्राचा वापर करून काम करण्यास भाग पाडत आहेत. हक्काचा नकार देणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांवर थेट पोलिसांत गुन्हे दाखल करण्याची दडपशाही स्थानिक प्रशासनाने सुरू केली आहे. शासकीय आदेशाची उघड पायमल्ली करणाऱ्या नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांवरच उलट गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी आक्रमक मागणी यावेळी आंदोलकांनी पोलीस आयुक्तांकडे केली.

Sudhir mungantiwar: मुनगंटीवारांनी चंद्रपूरच्या पीक विमा हप्ता दरांचा मुद्दा मांडला, मुख्यमंत्र्यांनी दिले अहवाल सादर करण्याचे निर्देश

आशा गटप्रवर्तकांच्या या पेटलेल्या लढ्याची दखल राज्याचे सहसंचालक (राष्ट्रीय आरोग्य अभियान) राजेंद्र भालेराव यांनी घेतली असून, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबईच्या पत्राची गंभीर दखल घेत आशांवर निवडणूक कामाची सक्ती करू नये, अशी सूचना त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. या संदर्भात बोलताना संघटनेचे सरचिटणीस कॉ. श्याम काळे म्हणाले की, आशा गटप्रवर्तक हे आरोग्य विभागात अत्यल्प मानधनावर काम करणारे कर्मचारी आहेत. त्यांच्यावर अतिरिक्त निवडणूक कामांची सक्ती करणे हा निव्वळ अन्याय आहे. हा लढा कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून प्रशासकीय हुकूमशाही आणि अन्यायाविरोधात आहे. संघटनेच्या एकजुटीच्या बळावर आम्ही हा अन्याय मोडून काढू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

SIR campaign : एसआरआर मोहिमेत गोंधळ; हजारो मतदारांची नावे यादीतून गहाळ

आंदोलनादरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी महामुनी यांनाही आशांच्या स्थानिक मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यामध्ये प्रलंबित मानधन, पेन्शन, ग्रॅच्युइटी, रेकॉर्ड्स आणि आयुष्मान कार्ड यांसारख्या २१ न्याय्य मागण्यांचा समावेश असून, यावर लवकरच आरोग्य विभाग आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.

आजच्या या विराट आंदोलनात मंगला पांडे, मंदा डोंगरे, मंगला लोखंडे, सोनू कुकसे, ज्योती अंडरसहारे, फुलण घुटके, कौसल्या गणोरकर, संगीता फलके, सरिता खांडेकर, कविता भलावी, पौर्णिमा वासे, शितल कळमकर, अर्चना मेश्राम, मीना वागदे, संतोषी चव्हाण, गायत्री थोटे, प्रमिला घोडेस्वार, सारिका जोरांडे आणि मोहिनी बालपांडे यांच्यासह हजारो आशा भगिनींनी रस्त्यावर उतरून प्रशासकीय दडपशाहीचा तीव्र निषेध केला.

error: Content is protected !!