व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण NCP merger : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत हालचालींना वेग!

NCP merger : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत हालचालींना वेग!

rashtravadi-congress-merger-big-update-jayant-patil-sunetra-pawar-rohit-pawar : जयंत पाटील यांचे सुनेत्रा पवारांना आश्वासन, रोहित पवार अपडेट देणार

Mumbai: राज्यातील राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांच्या विलीनीकरणाचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. दोन्ही गटांमध्ये पडद्यामागे काही महत्त्वाच्या हालचाली सुरू असल्याचे संकेत मिळत असून, या पार्श्वभूमीवर लवकरच रोहित पवार पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. यात अजित पवार गट आणि शरद पवार गटातील नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली होती, याबाबत ते सविस्तर भूमिका मांडणार असल्याचे सांगितले जात आहे.

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली. त्यांच्या पश्चात दोन्ही गट पुन्हा एकत्र येतील का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. अजित पवार हयात असतानाच विलीनीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या आणि त्यासाठी ते सकारात्मक होते, असा दावा शरद पवार गटातील काही नेत्यांनी वेळोवेळी केला आहे. मात्र अजित पवार गटातील नेते प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनी अशा कोणत्याही औपचारिक चर्चेला दुजोरा नसल्याचे स्पष्ट करत हा दावा फेटाळला होता. त्यामुळे विलीनीकरणाचा मुद्दा अद्याप अनिश्चिततेतच अडकलेला आहे.

Cooperative bank : सहकारी बँकांमधील सत्तेच्या ‘मक्तेदारी’ला लगाम !

या साऱ्या घडामोडींमध्ये शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी केलेले विधान विशेष लक्षवेधी ठरले आहे. बारामती येथे काही नेत्यांसह त्यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्याचे सांगत, “काही मदत लागली तर नक्की सांगा, मनात कोणताही किंतू बाळगू नका,” असे आश्वासन दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विलीनीकरणाची चर्चा सुरू असताना सुनेत्रा पवार यांच्यासोबत एक-दोन वेळा भेट झाल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्यासाठी आपला गट सपोर्टिव्ह असल्याचे सांगत, त्यांच्या वाटेत अडथळे निर्माण करण्याची कोणतीही भूमिका नसल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर अजित पवार गटाकडून अधिकृत प्रतिक्रिया येते का, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी अलीकडेच लिहिलेल्या लेखातून विलीनीकरणाबाबत महत्त्वाचा दावा केला होता. १२ फेब्रुवारी रोजी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण करण्याचे ठरले होते आणि त्यानंतर पक्षाचे संपूर्ण नेतृत्व अजित पवार यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय झाल्याचे त्यांनी नमूद केले. विलीनीकरण हे अजित पवार यांचे स्वप्न होते आणि ते अपूर्ण राहिले असल्याची खंत व्यक्त करत, ते स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असेही शिंदे यांनी म्हटले होते.

Narhari zirwal : नरहरी झिरवळ प्रकरणात अडचणीत राष्ट्रवादी कोंडीत!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील नेत्यांच्या परस्परविरोधी दाव्यांमुळे विलीनीकरणाचा मुद्दा अधिकच गुंतागुंतीचा बनला आहे. आता रोहित पवार कोणते खुलासे करतात आणि त्यानंतर दोन्ही गटांची भूमिका काय राहते, यावर राज्यातील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!