Neet paper scam has strong Nagpur connection : CBI कडून अलोक नावाचा तरुण ताब्यात, आणखी मासे गळाला लागण्याची शक्यता
Nagpur वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ‘नीट’ (NEET-UG) परीक्षेचा पेपर फुटल्याने देशभर खळबळ उडाली असतानाच, आता या महाघोटाळ्यात नागपूरचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण प्रकरणात अनेक मोठे मासे अडकले असल्याचा संशय सुरुवातीपासूनच व्यक्त केला जात होता. त्यातच लातूर पॅटर्नचे प्रमुख मार्गदर्शक मोटेगावकर यांना पोलिसांनी आधीच ताब्यात घेतले असताना, आता या तपासाची सुई नागपूरकडे वळाली आहे. CBI ने नागपूरमधील अलोक नावाच्या एका तरुणास ताब्यात घेतले असून, त्याच्या अटकेने या घोटाळ्याची व्याप्ती किती मोठी आहे यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.
तपासादरम्यान समोर आलेल्या धक्कादायक माहितीनुसार, अलोक याने सुमारे एक हजार विद्यार्थ्यांना नीटचा पेपर विकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती पाहून २५ हजार रुपयांपासून तर एक लाख रुपयांपर्यंतच्या रकमा घेऊन हा पेपर विकण्यात आल्याचे सीबीआयच्या प्राथमिक तपासात उघड झाले आहे. अलोक हा या मोठ्या रॅकेटमधील एक महत्त्वाचा दलाल असण्याची शक्यता असून, आता त्याच्या माध्यमातून सीबीआय या संपूर्ण घोटाळ्याच्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे.
या घोटाळ्याची पाळेमुळे केवळ नागपूरपुरती मर्यादित नसून, महाराष्ट्राचे शैक्षणिक केंद्र समजल्या जाणाऱ्या लातूरशीही याचे थेट कनेक्शन जोडले गेले आहे. यापूर्वी लातूरमधील नामांकित कोचिंग क्लासेसचे संचालक आणि शिक्षक यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्र हादरले होते. बिहार, गुजरात आणि दिल्लीनंतर महाराष्ट्रातील लातूर आणि आता नागपुरात या पेपरफुटीचे केंद्र असल्याचे उघड झाल्याने पालकांमध्ये तीव्र संताप आणि चिंतेचे वातावरण आहे. अलोक याच्या बँक खात्यांचे व्यवहार, कॉल डिटेल्स आणि त्याने गोळा केलेली रक्कम कोणापर्यंत पोहोचवली, याचा तपास आता सीबीआय करत आहे. या कारवाईमुळे नागपूर आणि लातूरमधील शिक्षण क्षेत्रातील अनेक बड्या हस्ती आणि ‘मोठे मासे’ सीबीआयच्या गळाला लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात असून, प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या या रॅकेटचा मुख्य म्होरक्या लवकरच जेरबंद होण्याची चिन्हे आहेत.








