व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Sudhir mungantiwar : शेतकऱ्यांसाठी सुधीर मुनगंटीवार मैदानात! खत टंचाईपासून डिझेल संकटापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांना...

Sudhir mungantiwar : शेतकऱ्यांसाठी सुधीर मुनगंटीवार मैदानात! खत टंचाईपासून डिझेल संकटापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांना धडक निवेदन

sudhir-mungantiwar-letter-to-collector-over-fertilizer-shortage-and-diesel-crisis-for-farmers-chandrapur : तातडीने उपाययोजना कराव्या, काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

Chandrapur : खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या खत टंचाई आणि डिझेल समस्येवर माजी वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन दिले आहे. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांना युरिया, डीएपी खत आणि डिझेलच्या उपलब्धतेसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, तसेच कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

खरीप हंगाम सुरू झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी पेरणीपूर्व कामांमध्ये व्यस्त आहेत. मात्र अनेक कृषी केंद्रांमध्ये युरिया आणि डीएपी खताचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या निवेदनानुसार मुल तालुक्यातील ३२ कृषी केंद्रांपैकी केवळ २५ केंद्रांमध्ये युरिया उपलब्ध असून फक्त ९ केंद्रांमध्ये डीएपी खत उपलब्ध आहे. बल्लारपूर तालुक्यातील १५ कृषी केंद्रांपैकी ९ केंद्रांमध्ये युरिया तर केवळ ७ केंद्रांमध्ये डीएपी उपलब्ध आहे. पोंभूर्णा तालुक्यातील ३७ कृषी केंद्रांपैकी २६ केंद्रांमध्ये युरिया आणि फक्त ९ केंद्रांमध्ये डीएपी उपलब्ध असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच चंद्रपूर तालुक्यातील ६५ कृषी केंद्रांपैकी ३९ केंद्रांमध्ये युरिया आणि केवळ १९ केंद्रांमध्ये डीएपी खत उपलब्ध असल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

Sudhir mungantiwar : पाण्यासाठी तिसरे महायुद्ध टाळायचे असेल तर ‘जलयोद्धे’ तयार करा

मुनगंटीवार यांनी प्रशासनाचे लक्ष वेधताना सांगितले की, अनेक कृषी केंद्रांमध्ये युरिया उपलब्ध असले तरी डीएपीचा अत्यंत कमी साठा आहे. काही ठिकाणी दोन्ही खतांचा तुटवडा जाणवत असून शेतकऱ्यांना खतासाठी विविध कृषी केंद्रांवर फेऱ्या माराव्या लागत आहेत. त्यामुळे त्यांचा वेळ आणि आर्थिक खर्च वाढत आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शेतीची महत्त्वाची कामे सुरू असताना खत उपलब्ध नसल्यामुळे पेरणी आणि पिकांच्या वाढीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही ठिकाणी कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांची गैरसोय केली जात असल्याच्या तक्रारीही प्रशासनाकडे येत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

Sudhir Mungantiwar : चंद्रपूरच्या सुरक्षेचं ‘कवच’ होणार भक्कम; मुनगंटीवारांच्या पाठपुराव्याने नवीन पोलीस अधीक्षक कार्यालयाचा मार्ग मोकळा!

त्यामुळे बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील सर्व कृषी केंद्रांमध्ये युरिया आणि डीएपी खताचा पुरेसा साठा तात्काळ उपलब्ध करून द्यावा आणि खतांचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांना डिझेल उपलब्धतेबाबतही मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे मुनगंटीवार यांनी निवेदनात म्हटले आहे. खरीप हंगामातील नांगरणी, पेरणी, सिंचन आणि इतर शेती कामांसाठी ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, पाण्याचे पंप, जनरेटर आणि इतर कृषी यंत्रसामग्री चालविण्यासाठी मोठ्या प्रमाणात डिझेलची आवश्यकता असते. अनेक शेतकऱ्यांची शेती दुर्गम आणि जंगल परिसरात असल्याने प्रत्येक वेळी ट्रॅक्टर किंवा यंत्रसामग्री पेट्रोल पंपावर नेणे शक्य होत नाही. त्यामुळे शेतकरी डिझेल कॅनमध्ये घेऊन जाऊन शेतीची कामे करत असतात. मात्र सध्या अनेक पेट्रोल पंप चालकांकडून विविध कारणे सांगून कॅनमध्ये डिझेल देण्यास नकार दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे .

Sudhir Mungantiwar : चंद्रपूरच्या ट्रॅफिक जामचा ‘करेक्ट कार्यक्रम’; आमदार मुनगंटीवारांच्या पुढाकाराने वाहतूक कोंडी फुटणार!

या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना वेळेवर शेतीची कामे पूर्ण करता येत नसून उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागातील अनेक लहान आणि मध्यम शेतकऱ्यांकडे सर्व यंत्रसामग्री पेट्रोल पंपापर्यंत नेण्याची सुविधा नसल्याने त्यांची अडचण अधिक वाढली आहे. अनेक भागात विजेचा अभाव असल्यामुळे डिझेल पंपाच्या सहाय्याने शेतीला पाणी द्यावे लागत असल्याचेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

https://sattavedh.com/sudhir-mungantiwar-mla-sudhir-mungantiwar-rushed-to-stand-by-his-friend-in-pai

याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आधार कार्ड, सातबारा किंवा अन्य ओळखपत्रांच्या आधारे कॅनमध्ये डिझेल उपलब्ध करून देण्याचे आदेश द्यावेत, तसेच प्रत्येक पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र राखीव डिझेल कोटा ठेवण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

सर्वसामान्य कष्टकरी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने आक्रमक भूमिका घेणारे नेते म्हणून ओळख असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा शेती आणि ग्रामीण भागातील समस्यांवर प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर खत आणि डिझेल उपलब्धतेचा प्रश्न गंभीर बनत असताना प्रशासन आता यावर काय निर्णय घेते, याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!