Nilesh Ranes anger, accusations against Ravindra Chavan, conflict escalates : निलेश राणेंचा संताप, रवींद्र चव्हाणांवर थेट आरोप, संघर्ष चिघळला
Mumbai : मालवण नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांच्यातील संघर्ष शनिवारी नव्या टप्प्यावर पोहोचला आहे. मालवण पोलिसांनी भाजप कार्यकर्त्याच्या घरी बेकायदेशीरपणे घुसल्याप्रकरणी निलेश राणे यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल केला असून त्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापले आहे. काही दिवसांपूर्वी निलेश राणे यांनी एका भाजप कार्यकर्त्याच्या घरी ‘धाड’ मारली होती आणि त्या घरातून मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम सापडल्याचे त्यांनी सार्वजनिकपणे सांगितले होते. या घटनेनंतर दोन्ही बाजूंमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा पारा चढला असतानाच पोलिसांनी राणेंवर गुन्हा दाखल केला असून हा निर्णय राजकीय दडपशाहीखाली घेतल्याचा दावा राणे यांनी केला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना निलेश राणे म्हणाले की, “माझ्यावर गुन्हा दाखल होणार हे अपेक्षितच होतं. ज्यांच्या घरातून पैसे सापडले त्यांना साधी नोटीसही दिली नाही, पण माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आम्ही गुन्हा पकडून दिला, हाच आमचा गुन्हा झाला. खर्चिक निवडणूक सुरू आहे — चोरी करा, डाका टाका, पैसे उथळा, तरी काही कारवाई नाही; पण माझ्यासारख्या माणसावर लगेच गुन्हा दाखल होतो.” पोलिसांवर कारवाई राजकीय दडपणाखाली केल्याचा आरोप करीत ते पुढे म्हणाले की, “अजून दहा केसेस जरी लावल्या तरी पुढचे तीन दिवस मी यांना सोडणार नाही. अटक कधी करणार ते पोलिसांनी ठरवावं.”
Palghar Land Scam : सात कोटींच्या बाजारमूल्याच्या जमिनीची केवळ 70 लाखांना विक्री
त्यांनी थेट भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर आरोपांची सरबत्ती करत म्हटले की, “हे सगळं रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखालीच चालू आहे. ते कुणाच्या नंबरवर फोन करत आहेत, त्यांचा पीए कोणकोणाशी संपर्कात आहे, याची मला पूर्ण माहिती आहे. गुन्हा दाखल करून माझ्यासारखा माणूस डगमगणार नाही.” आता या आरोपांना रवींद्र चव्हाण काय उत्तर देणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष केंद्रीत आहे.
Nashik Tree Cutting Protest : “दुसरीकडे पाचपट जागा असेल तर साधुग्राम तिकडेच करा
निलेश राणेंवर दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत मालवण पोलीस ठाण्यात विजय केनवडेकर यांनी तक्रार नोंदवली होती. पोलीस स्थानकात भारतीय दंडसंहितेतील 189(1) बेकायदेशीर जमाव, 189(2) सार्वजनिक शांतता भंग, 329(4) चोरीच्या उद्देशाने घरात प्रवेश आणि 356(2) मानहानी या कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. गुन्हा नोंदवल्यानंतर मालवण नगरी आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकीय वातावरण पेटले असून या प्रकरणाचा परिणाम थेट नगरपरिषद निवडणूक प्रचारावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मालवणमध्ये सुरू असलेला हा सत्तासंघर्ष आता राणे आणि भाजप यांच्यातील प्रत्यक्ष राजकीय टक्कर बनला असून पुढील काही तासांत दोन्ही बाजूंकडून आणखी मोठे विधान किंवा आरोपांसह परिस्थिती अधिक तापण्याची शक्यता नाकारता येत नाही.
___








