व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Nashik Tree Cutting Protest : “दुसरीकडे पाचपट जागा असेल तर साधुग्राम तिकडेच...

Nashik Tree Cutting Protest : “दुसरीकडे पाचपट जागा असेल तर साधुग्राम तिकडेच करा

Don’t force Tapovan Raj Thackeray attacks on government : तपोवन उद्योगपतींच्या घशात घालू नका,” राज ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल

Nashik : नाशिकमध्ये 2027 साली होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीत तपोवन परिसरात साधू-महंतांसाठी 1150 एकरांवर साधुग्राम उभारण्याची योजना आखण्यात आली आहे. प्रशासनाच्या या योजनेत साधुग्रामसाठी 1800 झाडांची कत्तल होणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर नागरिक आणि पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाचा उद्रेक झाला आहे. गेल्या काही दिवसांत नाशिककर, पर्यावरण कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था, तसेच अनेक कलाकार आणि सेलिब्रिटी रस्त्यावर उतरून या वृक्षतोडीविरोधात आंदोलन करत आहेत.

विरोध अधिक तीव्र होत असताना शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या कारवाईवर कडाडून टीका केली होती. आता या आंदोलनात मनसे प्रमुख राज ठाकरे यांचाही प्रवेश झाला असून त्यांनी राज्य सरकारवर थेट निशाणा साधत “साधूंच्या नावाखाली जमीन सपाट करून उद्योगपतींच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरू आहे” असा आरोप केला आहे.

Rohit Pawar : विरोधकांना थेट कापून टाकण्याची मानसिकता येते कुठून?

पोस्टद्वारे प्रतिक्रिया देताना राज ठाकरे म्हणाले की, कुंभमेळा नाशिकमध्ये काही पहिल्यांदा होत नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सत्ताकाळातही कुंभमेळा झाला होता. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा उभारल्या गेल्या, उत्तम नियोजन झाले आणि महापालिका व प्रशासनाच्या समन्वयामुळे कोणतीही झाडतोड न करता कामे पूर्ण झाली. तेव्हाच्या नगरसेवक, महापौर आणि आयुक्तांचा थेट अमेरिकेत सन्मान करण्यात आला होता, हेही त्यांनी विशेषत्वाने नमूद केले. मग आज साधुग्रामसाठी झाडं तोडण्याची का गरज निर्माण झाली? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

झाडांची भरपाई म्हणून दुसरीकडे वृक्षारोपण करण्याच्या सरकारी भूमिकेलाही त्यांनी धूळ चारली. सरकारने अशा पोकळ आश्वासनांनी लोकांची दिशाभूल करू नये, असा आरोप करत “जर दुसरीकडे पाचपट झाडं लावायला जागा आहे म्हणता, तर मग साधुग्राम तिथेच करा. झाडं तोडून उद्योगपतींना प्लॉट द्यायचा हा प्रकार थांबवा,” असा टोला राज ठाकरे यांनी लगावला. काही वर्षांपूर्वी सरकारने “कोट्यवधी झाडं लावली” अशी जाहिरात केली होती, पण ती झाडं आज कुठे दिसत नाहीत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Local body election : 57 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार, पण निकाल न्यायप्रविष्ट !

राज ठाकरे पुढे म्हणाले की, “आज कुंभमेळ्याचं कारण देत झाडं तोडायची, साधूंच्या नावाने जमीन सपाट करून घ्यायची आणि पुढे ती लाडक्या उद्योगपतींना दान करायची एवढाच विचार सरकारचा दिसतोय. महाराष्ट्रात सध्या जमीन काबीज करणं आणि उद्योगपतींचे दलाल म्हणून काम करणं हेच सत्तेत असलेल्यांचं मुख्य काम झालेलं दिसतं,” असा घणाघात त्यांनी केला.

नाशिककरांच्या लढ्याला पाठिंबा जाहीर करत राज ठाकरे यांनी सांगितले की, “नाशिककरांनी ठाम राहावं, त्यांच्या मागे महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठामपणे उभी आहे.” या विषयात कोणतेच राजकारण नाही आणि आगामी निवडणुकांनंतरही मनसेचा वृक्षतोडीला विरोध कायम राहील, असा पुनरुच्चार त्यांनी केला. सरकारला आवाहन करत “उगाच संघर्ष वाढवू नका, लोकांच्या भावना आणि मागण्यांचा आदर करा,” असे सांगत त्यांनी चेतावणी दिली की, जर सरकारने संघर्षाची भूमिका घेतली तर जनतेसोबत या लढ्यात मनसे अग्रेसर राहील.

Local Body Elections : शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपसाठी मतांचा जोगवा

नाशिकमधील तपोवन परिसरातील झाडतोडीला आता राजकीय रंग चढला असून विरोधक, पर्यावरणप्रेमी आणि नागरिक यांचा एकत्रित विरोध अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. हा संघर्ष आणखी तीव्र झाला तर सभासद, नागरिक, पर्यावरण तज्ज्ञ आणि धार्मिक मठांकडूनही पुढील काही दिवसांत ठोस भूमिका समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
____

error: Content is protected !!