Metro-route-crucial-to-the-economic-development-of-Amravati-remains-stuck-on-paper : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दोन वेळा घोषणा, प्रकल्प पुढे सरकेना
Amravati उद्योजकांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे अमरावती–नागपूर ब्रॉडगेज मेट्रो प्रकल्प गेल्या पाच वर्षांपासून प्रत्यक्षात न येता कागदावरच रखडला आहे. यामुळे अमरावतीकरांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दोन वेळा ब्रॉडगेज मेट्रो सुरू होणार असल्याची घोषणा केली होती. प्रस्ताव केंद्रीय रेल्वे मंत्र्यांपर्यंतही पोहोचला होता. मात्र, पुढील टप्प्यात हा प्रकल्प बारगळला.
यानंतर नागपूर शहरात मेट्रो प्रकल्प कार्यान्वित झाला, मात्र अमरावती–नागपूर मेट्रो अद्याप ‘कागदी रुळांवरच’ असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. ही मेट्रो सुरू झाली असती, तर अमरावती ते नागपूर हे अंतर अवघ्या १ तास १० मिनिटांत पूर्ण झाले असते. सध्या मात्र कोणत्याही सुपरफास्ट रेल्वेने नागपूर गाठण्यासाठी ३ तास १५ ते ३ तास ३० मिनिटे इतका वेळ लागत आहे.
Akola RTO : अकोला प्रादेशिक परिवहन कार्यालय टाकणार कात; १५ कोटींच्या विकासकामांना लवकरच सुरुवात
पश्चिम विदर्भाला आजही सापत्न वागणूक दिली जात असल्याचा आरोप होत असून, अमरावतीचा विकास केवळ घोषणांपुरताच मर्यादित राहिल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. ९ फेब्रुवारी २०२१ रोजी माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी पत्राद्वारे अमरावती–नागपूर ब्रॉडगेज मेट्रोची मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती.
या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या प्रचारसभेत तसेच व्हेलकम पॉइंटवरील उड्डाणपुलाच्या भूमीपूजनप्रसंगी गडकरी यांनी मेट्रो सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर हा प्रस्ताव केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे पाठविण्यात आला. रेल्वे मार्ग, सिग्नल यंत्रणा व स्थानकांचा वापर मेट्रोसाठी होणार असल्याने रेल्वे मंत्रालयाची मंजुरीही मिळाली होती.
Shegaon blackmail case : शेगावमध्ये विद्यार्थिनीला अश्लील फोटो व्हायरलची धमकी देत ब्लॅकमेल!
मार्च २०१९ मध्ये राज्य शासनाने या प्रकल्पाला मान्यता दिली होती, तसेच काही दिवसांतच रेल्वे मंत्रालयाने डीपीआरलाही मंजुरी दिली होती. मात्र, हा प्रकल्प पूर्णतः व्यावसायिक तत्त्वावर राबविण्यात येणार असल्याने उद्योजकांनी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले. अपेक्षित गुंतवणूकदार पुढे न आल्याने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रत्यक्षात साकार होऊ शकला नाही.
ही मेट्रो सुरू झाली असती, तर इकॉनॉमी व बिझनेस अशा दोन श्रेणींसह आठ कोच असलेली सेवा सुरू झाली असती. यामध्ये सहा कोच प्रवाशांसाठी, तर दोन कोच मालवाहतुकीसाठी नियोजित होते. औषधे, उत्पादने, भाजीपाला व दुग्धजन्य पदार्थांची जलद वाहतूक शक्य झाली असती. यामुळे लहान व्यापाऱ्यांना फायदा झाला असता, तसेच मेट्रोच्या विविध पदांवर नियुक्त्यांमुळे स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळाला असता.
दरम्यान, “अमरावती–नागपूर मेट्रो सुरू झाल्यास अमरावतीच्या आर्थिक विकासाला निश्चितच चालना मिळेल. नागपूर मेट्रोसाठी कोट्यवधी रुपये खर्च होत असताना अमरावतीसाठी हात आखडता का घेतला जातो,” असा सवाल माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे शासनासह संबंधित महामंडळांनी हा प्रकल्प पुन्हा गांभीर्याने हाती घ्यावा, अशी मागणी होत आहे.








