Part time teachers are waiting for honorarium since four months : चार महिन्यांपासून घड्याळी तासिका शिक्षकांना पैसेच मिळाले नाहीत
Salekasa Gondia चार महिने मानधनाची वाट बघितली. अनेकवेळा प्रशासनाला आठवण करून दिली. पण तरीही उपयोग झाला नाही. आता मानधन मिळेपर्यंत रजेवर जाण्याच्या निर्णयावर घड्याली तासिका शिक्षक ठाम आहेत. 23 जानेवारीपासून शिक्षक रजेवर आणि विद्यार्थी वाऱ्यावर आहेत.
जिल्ह्यातील माध्यमिक शाळांत मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची पदे रिक्त आहेत. अशावेळी शिक्षकांच्या रजा कालावधीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते. म्हणून शासनाच्या आदेशानुसार शिक्षण संस्थांच्या माध्यमातून घड्याळी तासिका शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. परंतु या शिक्षकांचे मानधन मागील चार महिन्यांपासून थकल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. रिकाम्या पोटी शिकवायचे कसे, असा सवाल या शिक्षकांनी केला आहे.
सालेकसा तालुक्यातील जि. प. हायस्कूल, साखरीटोला येथे कार्यरत घड्याळी तासिका शिक्षकांना ऑगस्ट २०२४ पासून मानधन मिळालेले नाही. परिणामी त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. शिक्षकांनी शाळेचे प्राचार्य परदेशी, जिल्हा परिषदेच्या सदस्या वंदना काळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी सालेकसा, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कृपाल बहेकार, सरपंच नरेश कावरे यांना निवेदन देऊन या समस्येकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
अखेर शिक्षकांनी २३ जानेवारीपासून मानधन मिळेपर्यंत रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. तासिका शिक्षक अधिक काळ रजेवर असल्यास विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होणार आहे. याची दखल शिक्षण विभागाने घ्यावी, अशी पालकांची मागणी आहे. घड्याळी तासिकांवर शिकविणारे शिक्षक उच्च शैक्षणिक पात्रताधारक आहेत. परंतु नोकरी मिळत नसल्याने अल्प मानधनात ते शाळेत शिक्षणाचे कार्य करीत आहेत. त्यांना वेळेत मानधन देण्याची जबाबदारी शासनाची आहे.
चार महिन्यांपासून शिक्षकांना मानधन देण्यात आलेले नाही. या शिक्षकांनी उपाशीपोटी शिकवावे कसे, कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवावा कसा? असे अनेक प्रश्न शिक्षकांसमोर निर्माण झाले आहेत. त्यामुळे शासनाने यावर त्वरित तोडगा काढण्याची मागणी तासिका शिक्षक जी. डी. खरवडे, एम. एस. दोनोंडे, एम. पी. कटकवार, आर. पी. बैस, एस. के. बोपचे, पी. आर. हरीणखेडे यांनी केली आहे.