400 special guests invited to Jay’s wedding, sparking political discussions : जयच्या लग्न सोहळ्याला ४०० खास पाहुण्यांना निमंत्रण, राजकीय चर्चांना उधाण
Mumbai: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार आणि ऋतुजा पाटील यांच्या विवाह सोहळ्याचा जल्लोष बहरीनमध्ये ४, ५ आणि ७ डिसेंबर रोजी पार पडणार असून पवार – पाटील कुटुंबात सुरू असलेल्या तयारीसोबतच अनुपस्थित राहणाऱ्या सदस्यांमुळेही मोठी चर्चा रंगू लागली आहे. या विवाह समारंभासाठी केवळ ४०० पाहुण्यांना आमंत्रण देण्यात आलं असून हा सोहळा कुटुंबीयांचा मोठा आणि भव्य असला तरी उपस्थितांच्या संख्येवर घातलेल्या मर्यादेमुळे अनेक मोठे राजकीय आणि कौटुंबिक चेहरे लग्नाला गैरहजर राहणार असल्याची माहिती समोर येत आहे.
त्यात शरद पवार, सुप्रिया सुळे इतर नातेवाईक तसेच अजित पवारांचे सख्खे धाकटे भाऊ श्रीनिवास पवार आणि त्यांच्या पत्नींची अनुपस्थिती विशेष चर्चेचा विषय ठरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार ते या काळात बेंगलोर येथे दुसऱ्या विवाह कार्यक्रमासाठी जाणार असल्यामुळे बहरीन येथे पोहोचू शकणार नाहीत. त्यामुळे कुटुंबातील या मोठ्या सोहळ्यापासून त्यांचे दूर राहणे राजकीय वर्तुळात भाऊबंदकीच्या चर्चेला आणखी खतपाणी घालत आहे.
Local body election : जिल्हा परिषद निवडणुकांपूर्वीच महानगरपालिका निवडणुका?
युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांच्या नुकत्याच पार पडलेल्या विवाह सोहळ्यातही अजित पवार अनुपस्थित राहिले होते, ते निवडणूक प्रचारात व्यस्त असल्याचे कारण सांगण्यात आले होते. दरम्यान, त्याच समारंभाला कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते आणि पवार कुटुंबातील अनेक नातेवाईक या विवाह समारंभातूनच थेट बहरीनच्या तयारीत व्यस्त झाले आहेत. जय पवार–ऋतुजा पाटील यांच्या विवाह सोहळ्याला कोण–कोण जाणार, कोण अनुपस्थित राहणार आणि त्यामागची कारणे यावर आता राजकीय व सामाजिक वर्तुळात रसिकतेने चर्चा सुरू आहे.
माहिती समोर येत आहे की, सुप्रिया सुळे संसदीय कामकाजामुळे बहरीनला जाण्याची शक्यता कमी आहे, तर ज्येष्ठ नेते शरद पवार दूरचा प्रवास टाळत असल्याने तेही बहरीनला पोहोचणार नाहीत. प्रफुल पटेल स्वतः लग्नाला जाणार नसून त्यांच्या कुटुंबातील सदस्य बहरीनमध्ये उपस्थित राहणार असून सुनील तटकरे देखील उपस्थित राहणार नाहीत, मात्र त्यांचे कुटुंब लग्नाला जाणार आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून फक्त दोनच नेते प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनाच औपचारिक आमंत्रण देण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. कुटुंबाचा मोठा सोहळा असूनही राजकीय पाहुण्यांची संख्या अत्यंत मर्यादित ठेवण्यात आल्याने हा विवाह प्रामुख्याने कौटुंबिक आणि निवडक पाहुण्यांच्या उपस्थितीतच पार पडणार आहे.
विवाह कार्यक्रम चार दिवसांचा असून ४ डिसेंबर रोजी मेहेंदी, ५ डिसेंबर रोजी हळदी, वरात आणि मुख्य विवाहसोहळा, ६ डिसेंबर रोजी संगीत आणि ७ डिसेंबर रोजी स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. जय पवार यांच्या लग्नाची पत्रिका समोर आल्यानंतर कार्यक्रमाची संपूर्ण रूपरेषा स्पष्ट झाली असून मागील काही दिवसांपासून पवार–पाटील कुटुंबीयांसह निमंत्रित पाहुण्यांची तयारी जोरात सुरू आहे. कुटुंबातील दोन मोठे विवाह अल्पावधीत होत असल्याने आणि त्यात अनुपस्थिती व उपस्थितीच्या चर्चेतून निर्माण झालेल्या अनुमानांमुळे पवार कुटुंबातील अंतर्गत समीकरणांकडेही सर्वांचे लक्ष वेधले जात आहे.
जय पवार–ऋतुजा पाटील यांचा विवाह परदेशात मोठ्या उत्साहात आणि वैभवात पार पडणार असला तरी कुटुंबातील महत्त्वाच्या सदस्यांच्या अनुपस्थितीमुळे हा सोहळा राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे.








