Uncle Sharad Pawar is upset over Ajit Pawar’s watch offer : अजित पवारांच्या घड्याळाच्या ऑफरवर काका शरद पवार नाराज
Pune: आगामी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. अजित पवार गटाकडून शरद पवार गटासमोर ठेवण्यात आलेल्या एका प्रस्तावामुळे काका शरद पवार नाराज झाल्याची माहिती असून, अर्ध्या रात्रीपर्यंत सुरू असलेल्या बैठका निष्फळ ठरल्या आहेत. त्यामुळे पुणे महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता जवळपास मावळली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
पुण्यातील एका हॉटेलमध्ये काल रात्री महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला शरद पवार गटाकडून बापूसाहेब पठारे आणि अंकुश काकडे, काँग्रेसकडून अरविंद शिंदे आणि रमेश बागवे तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून वसंत मोरे उपस्थित होते. पुणे महापालिका निवडणुकीची रणनीती, संभाव्य युती आणि जागावाटप यावर यावेळी सविस्तर चर्चा झाली.
दरम्यान, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकांसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. त्यासाठी दोन्ही गटांतील नेत्यांमध्ये बैठकींचे सत्रही झाले. प्राथमिक स्तरावर तीन बैठका झाल्याची माहिती आहे. मात्र, जागावाटपाचा मुद्दा आणि विशेषतः निवडणूक चिन्हावरून निर्माण झालेला वाद हे एकत्र येण्यातील मोठे अडथळे ठरले.
सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार यांच्या पक्षासमोर पुणे महापालिका निवडणूक घड्याळ या चिन्हावर लढवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. हा प्रस्ताव मांडल्यानंतर शरद पवार गटातील नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे समजते. त्याचबरोबर अधिक जागांची मागणीही शरद पवार गटाकडून अजित पवार गटाकडे करण्यात आली होती.
Local Body Elections : पुरे झाली राजकीय चिखलफेक, आता काम करा!
काल अजित पवारांच्या निवासस्थानी शरद पवार गटाकडून खासदार अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवार चर्चा करण्यासाठी गेले होते. या बैठकीत घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव औपचारिकरित्या मांडण्यात आला. मात्र, हा प्रस्ताव शरद पवार पक्षाला मान्य नसल्याचे स्पष्ट झाले. पालिका निवडणुकीसाठी घड्याळाचे चिन्ह स्वीकारण्यास शरद पवार गटातील अनेक नेते स्पष्टपणे विरोधात असल्याची माहिती आहे.
या पार्श्वभूमीवर शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याची शक्यता बळावली आहे. काल रात्री शरद पवार गट, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसे यांच्यातही पुण्यात बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. पुणे महापालिका निवडणुकीसाठी मनसेला महाविकास आघाडीत सामावून घेतले जाणार का, याबाबतही चर्चा सुरू असून त्यावर लवकरच स्पष्ट भूमिका समोर येण्याची शक्यता आहे.
Local Body Elections : ‘एमआयएम’चे वाढतेय प्रस्थ, काँग्रेसची वाढतेय चिंता
एकंदर पाहता, अजित पवारांच्या घड्याळाच्या चिन्हावरील ऑफरमुळे आणि जागावाटपावरून निर्माण झालेल्या तणावामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे रिंगणात उतरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. आज दोन्ही पक्षांकडून याबाबत सूचक विधाने किंवा अधिकृत भूमिका मांडली जाऊ शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
__








