Tough Competition for Co-opted Members : इच्छुकांची भाऊगर्दी आणि राजकीय चुरस, १७ उमेदवार रिंगणात, १३ जानेवारीला फैसला
Malkapur मलकापूर नगरपरिषदेतील स्वीकृत सदस्यपदाच्या निवडीने आता उत्कंठावर्धक वळण घेतले असून, राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल १७ जणांनी दंड थोपटल्याने या पदासाठीची चुरस टोकाला पोहोचली आहे. यामध्ये प्रामुख्याने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून सर्वाधिक १५ जणांनी दावा केला असला तरी, भाजपचे युवानेते शिवराज जाधव आणि मलकापूर विकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रसाद जाधव यांच्या अर्जामुळे राजकीय गणिते कमालीची गुंतागुंतीची झाली आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालानंतर नगरपरिषदेचे संख्याबळ पाहता स्वीकृत सदस्यांच्या निवडीत प्रत्येक मताचे महत्त्व वाढले आहे. थेट जनतेतून निवडून आलेले नगराध्यक्ष आणि काँग्रेसचे १५ नगरसेवक असे भक्कम संख्याबळ एका बाजूला असतानाच, दुसरीकडे भाजपचे ६, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ४, एमआयएम ३, शिवसेना (उबाठा) १ आणि एका अपक्ष सदस्याच्या जोरावर विरोधी गटानेही मोर्चेबांधणी केली आहे. सध्याच्या राजकीय अंकगणितानुसार काँग्रेस, भाजप आणि मलकापूर विकास आघाडी यांच्या वाट्याला प्रत्येकी एक स्वीकृत सदस्यपद मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
Political Outreach: देऊळगाव राजात प्रलंबित प्रश्नांचा पाढा; जनता दरबारात तक्रारींचा ओघ
या सर्व प्रक्रियेत काँग्रेसकडून इच्छुकांची मोठी फळी मैदानात असल्याने पक्षांतर्गत नाराजी टाळण्याचे आव्हान नेतृत्वापुढे आहे. तर दुसरीकडे, शिवराज जाधव आणि प्रसाद जाधव यांच्यासारख्या बड्या नावांनी अर्ज दाखल केल्याने भाजपने आणि विकास आघाडीने ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याचे दिसून येत आहे. या उमेदवारी अर्जांमुळे अंतर्गत गोटात मोठ्या हालचाली सुरू झाल्या असून, कोणाची वर्णी लागेल यावरून तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
पिठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष अतिकुर रहेमान जवारीवाले यांनी १३ जानेवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा बोलावली असून, याच सभेत स्वीकृत सदस्यांच्या नावांवर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. या निवडीच्या निमित्ताने मलकापूर नगरपरिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नवा ‘पॉवर गेम’ पाहायला मिळण्याची चिन्हे असून, १३ तारखेला कोणाची वर्णी लागते याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.








