Congress attavks over the naming of Nagpur’s Dighori flyover after Dr. Hedgewar : दिघोरी उड्डाणपुलाच्या ‘हेडगेवार’ नामकरणावरून काँग्रेस आक्रमक, प्रफुल गुडधेंचा संघावर थेट हल्लाबोल
Nagpur इंदोरा ते दिघोरी उड्डाणपुलाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचे नाव देण्यावरून नागपुरातील राजकीय वातावरण तापले असून, काँग्रेसने या नामकरणावर तीव्र आक्षेप घेतला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या आद्य सरसंघचालकांचे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात काय योगदान होते असा थेट सवाल उपस्थित करत नागपूर शहर काँग्रेस अध्यक्ष प्रफुल गुडधे यांनी या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. संघ ही एक खाजगी संस्था असून, एखाद्या कबड्डी मंडळाप्रमाणे तिचा कारभार चालतो, असा घणाघाती आरोपही त्यांनी केला.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नुकताच या उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा पार पडला. या कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी स्पष्ट केले होते की, केवळ उड्डाणपुलाला डॉ. हेडगेवार यांचे नाव देण्यात आले असून पुलाखालील ऐतिहासिक आणि मूळ चौकांची नावे मन्चरशा जनरल आवारी चौक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक कायम ठेवण्यात आली आहेत. यापूर्वी युवक काँग्रेसने चौकांची
नावे बदलण्याच्या शंकेवरून आंदोलन केले होते. मात्र, आता गुडधे यांनी थेट संघाच्या भूमिकेवरच बोट ठेवल्याने हा नामांतराचा वाद अधिक पेटण्याची चिन्हे आहेत. गुडधे माध्यमांशी बोलताना म्हणाले, महात्मा गांधींची हत्या असो की इतर संशयास्पद कारवाया, संघाच्या भूमिकेवर नेहमीच प्रश्नचिन्ह राहिले आहे. ही कोणतीही घटनात्मक संस्था नाही. नागरिक म्हणून किंवा संघटना म्हणून स्वातंत्र्यलढ्यात संघाच्या स्वयंसेवकांचे काडीचेही योगदान राहिलेले नाही.
Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा पुढचा टप्पा नेमका काय
या वेळी पक्षाच्या आर्थिक आणि संघटनात्मक बांधणीवर बोलताना गुडधे यांनी काँग्रेसच्या ‘क्राऊड फंडिंग’ उपक्रमाची माहिती दिली. गणेशोत्सवापासून सुरू केलेल्या या अभियानाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगत, पारदर्शकतेसाठी QR कोडद्वारे थेट बँकेत निधी जमा केला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
१९२० मधील नागपूर अधिवेशनादरम्यान लोकमान्य टिळकांच्या नावाने असाच स्वराज फंड उभारला गेला होता, ज्याचा वापर स्वातंत्र्यलढा आणि पक्षसंघटनेसाठी झाला,” याची आठवण करून देत गुडधे म्हणाले, सत्ता असताना निधी मिळवणे सोपे असते, मात्र काँग्रेससाठी थेट जनतेचा सहभाग महत्त्वाचा आहे. या क्राऊड फंडिंगमुळे कार्यकर्त्यांमध्ये पक्षाबद्दल आपुलकी आणि मालकीची भावना निर्माण होईल असे गुडधे म्हणाले.








