BJP openly in love with Israel; Prakash Ambedkar criticises BJP, attacks opposition : वंचितचे इराणच्या समर्थनार्थ १ ऑक्टोबरला मुंबईत निदर्शने
Nagpur देशात सध्या विरोधी पक्ष पूर्णपणे कोमात गेला असून जागतिक आणि प्रादेशिक प्रश्नांकडे मुद्दाम दुर्लक्ष केले जात आहे, अशी घणाघाती टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना केली. केंद्र सरकारच्या परराष्ट्र आणि इस्रायल धोरणावर कडक शब्दांत ताशेरे ओढत, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने येत्या १ ऑक्टोबर रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ‘आम्ही इराणसोबत आहोत’ असा भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
खाडी देशांमध्ये सुरू झालेल्या युद्धाचा थेट फटका भारताच्या अर्थव्यवस्थेला आणि सामान्य माणसाच्या बजेटला बसणार असल्याचे सांगत, आधी ६० डॉलरला मिळणारे क्रूड ऑइल आता १०५ डॉलरवर गेले असून हे युद्ध जसे भडकेल तसे दर आणखी वाढणार आहेत, असा इशारा त्यांनी दिला. त्यामुळे देशाचे बजेट कोलमडू नये म्हणून क्रूड ऑइल स्वस्तात कसे मिळेल याकडे केंद्राने लक्ष दिले पाहिजे, असे आंबेडकर म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, संघ आणि भाजपचे लोक इस्रायलवर उघडपणे प्रेम दाखवत आहेत, मात्र दुसऱ्या महायुद्धात त्यांचे प्रेम मुसोलिनी आणि हिटलरवर होते. भारतावर ज्या ज्या वेळी संकटे आली, तेव्हा अरब देशांपैकी एकमेव इराणच भारताच्या पाठीशी उभा राहिला होता. त्यामुळे भारत सरकारनेही इराणसोबत ठामपणे उभे राहिले पाहिजे. राज्यातील सामान्य माणसाला देव आणि जातीच्या चौकटीतून बाहेर पडू दिले जात नसून या सर्व परिस्थितीची जाणीव करून देण्यासाठी नागरिक आणि केंद्र सरकारने इराणच्या पाठीशी उभे राहावे, या मागणीसाठी १ ऑक्टोबरला आंदोलन करणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.








