swear in the name of Golwalkar Guruji and state that the BJP did not buy votes, Prafulla Gudadhe challenges dr. Rajeev potdar: प्रफुल्ल गुडधे यांचे थेट आव्हान, भाजपचा पुन्हा दुकान म्हणून केला उल्लेख
Nagpur नागपूर विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर नागपूरच्या राजकीय वर्तुळात प्रचंड भूकंप झाला आहे. भाजपचे उमेदवार डॉ. राजीव पोतदार यांनी तब्बल १०० हून अधिक जादा मते घेत विक्रमी विजय तर नोंदवला, मात्र या विजयावरून आता काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोपांचे युद्ध पेटले आहे.
काँग्रेसची सुमारे ७० मते फुटल्याने महाआघाडीला मोठा धक्का बसला असून, भाजपने ही सर्व मते पैशांच्या बळावर खरेदी केल्याचा थेट आरोप काँग्रेसने केला आहे. भाजपचे नवनिर्वाचित आमदार राजीव पोतदार यांनी मात्र काँग्रेसचे सर्व आरोप फेटाळून लावत, पैसे घेतल्याचा आरोप करणाऱ्यांनी भाजप कडून पैसे घेतलेला एक तरी नगरसेवक दाखवून द्यावा, असे उघडे आव्हान काँग्रेसला दिले.
भाजपच्या या आव्हानाला नागपूर काँग्रेसचे अध्यक्ष प्रफुल्ल गुडधे यांनी आक्रमक भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. आमच्या नगरसेवकांना पोतदार यांनी पैसे दिले नाहीत, हे त्यांनी गोळवलकर गुरुजींची किंवा थेट नाथूराम गोडसेची शपथ घेऊन सांगावे. महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची खोटी शपथ हे लोक सहज घेऊ शकतात, म्हणूनच त्यांनी त्यांच्याच विचारधारेच्या नेत्यांची शपथ घेऊन दाखवावी, असा सणसणीत टोला गुडधे यांनी लगावला.
काँग्रेसची निर्मिती एका विचारातून आणि मोठ्या आंदोलनाच्या इतिहासातून झाली असून काँग्रेस हे कोणतेही दुकान नाही, तर तो लोकांचा पक्ष आहे, असे सांगत त्यांनी भाजपच्या व्यापारी राजकारणावर जोरदार प्रहार केला. ज्या पक्षात खरेदी विक्रीचे व्यवहार होतात त्याला दुकान नाही तर काय म्हणायचे असा सवाल गुडधे यांनी केला.
या वेळी प्रफुल्ल गुडधे यांनी काँग्रेसची मते फुटल्याची गोष्ट जाहीरपणे मान्य केली. मात्र हे वैचारिक परिवर्तन नसल्याचा दावा त्यांनी केला. आमच्या नगरसेवकांनी भाजपच्या विचारधारेला स्वीकारून मत दिले हे निव्वळ अशक्य आहे. पैसे न देता काँग्रेसची मते फुटली हे पोतदार यांनी गोळवलकर गुरुजी किंवा गोडसेची शपथ घेऊन सिद्ध करावे, असे ते म्हणाले.
आमच्याकडे विजयासाठी पुरेसे संख्याबळ नव्हते, तरीही आम्ही केवळ लोकशाही वाचवण्यासाठी ही निवडणूक लढलो, असे सांगताना गुडधे यांनी भाजपला त्यांच्या भूतकाळाची आठवण करून दिली. त्यावेळी भाजपच्या उमेदवारांची अनामत, जमानत जप्त होत होती, तेव्हाही ते निवडणुका लढतच होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.








