Pragya Rajiv Satav : पक्ष सोडला पण राहुल – सोनिया गांधी माझ्यासाठी दैवत

Pragya Satav clarified after joining BJP : भाजप प्रवेशानंतर प्रज्ञा सातव यांनी स्पष्ट केली भूमिका

Mumbai: काँग्रेसच्या विधानपरिषदेच्या आमदार असलेल्या प्रज्ञा सातव यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. भाजपमध्ये प्रवेश करूनही राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याविषयी आदर कायम असल्याचे त्यांनी जाहीरपणे सांगितले आहे. मी केवळ विकासाच्या ध्यासापोटी भाजपमध्ये प्रवेश केला असून, काँग्रेसने मला दोन वेळा विधानपरिषदेवर जाण्याची संधी दिली, त्यासाठी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची मी कायम ऋणी आहे. ते दोघेही आजही माझ्यासाठी दैवतच आहेत, असे प्रज्ञा सातव यांनी स्पष्टपणे सांगितले.

प्रज्ञा सातव यांनी गुरुवारी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांची आमदारकीची पाच वर्षांची टर्म अद्याप शिल्लक असतानाच त्यांनी हा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात होते. या पार्श्वभूमीवर हिंगोलीत भाजप नेते मुटकुळे यांच्या कार्यालयाला भेट दिल्यानंतर त्यांनी ‘एबीपी माझा’शी संवाद साधला. यावेळी काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाण्यामागील कारण विचारले असता त्यांनी विकासाचा मुद्दा पुन्हा अधोरेखित केला.

Municipal Corporation Election : सत्तास्थापनेसाठी ४४ हा ‘मॅजिक फिगर’!

भाजपच्या कार्यकर्त्यांनी आज आमचे आनंदाने स्वागत केले. त्यांनी दाखवलेले प्रेम पाहून मी भारावून गेले आहे. आता पुढे आम्ही राजूभाऊंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकत्र काम करणार आहोत. विकास हाच आमचा एकमेव ध्यास आहे, असे प्रज्ञा सातव यांनी सांगितले. आमदारकीची मुदत बाकी असताना पक्षबदल का केला, या प्रश्नावर बोलताना त्यांनी जिल्ह्यातील विकासाचा अनुशेष समोर ठेवला. कळंबोली परिसरात विकासाची मोठी कमतरता राहिली असून, विशेषतः शेतकरी, सिंचन आणि मूलभूत सुविधांच्या बाबतीत अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. आमचे कार्यकर्ते विकासाच्या प्रतीक्षेत आहेत आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली चौफेर विकास होत आहे. समृद्धी महामार्गामुळे आमचे कार्यकर्ते एका रात्रीत मुंबईत पक्षप्रवेशासाठी पोहोचू शकले, हेच विकासाचे उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले.

BJP OBC wing : डॉ. रणजीत पाटलांचे काम केल्यामुळे डावलले, हा आरोप निराधार

दरम्यान, काँग्रेस नेतृत्वाबाबत बोलताना प्रज्ञा सातव यांनी भावनिक भूमिका मांडली. काँग्रेस पक्षाने मला दोन वेळा विधानपरिषदेवर पाठवले, हे मी कधीही नाकारणार नाही. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या आशीर्वादामुळेच मला आमदारकी मिळाली. राजीव सातव आणि रजनी सातव यांच्याप्रमाणेच सोनिया गांधी आणि राहुल गांधी माझ्या मनात कायम राहतील. मॅडम आणि बॉस हे माझ्यासाठी देवासमान आहेत, असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

Devendra Fadnavis : देवाभाऊ! अजब तुझे सरकार; शेतकरी फिरे दारोदार

भाजपमध्ये येताना आपण कोणतीही अट किंवा मागणी केली नसल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले. देवेंद्र फडणवीस किंवा भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे मी काहीही मागितलेले नाही. मी स्वखुशीने भाजपमध्ये आले असून, आता भाजपची एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. सतेज पाटील यांना विधानपरिषदेत विरोधी पक्षनेतेपद मिळू नये म्हणून भाजपने आपल्याला पक्षात घेतले, या चर्चांवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. अशा कोणत्याही चर्चांची मला माहिती नाही. नुकतेच विधानपरिषदेचे अधिवेशन झाले असून, संख्याबळ असते तर त्याच अधिवेशनात विरोधी पक्षनेते दिसले असते, असे सांगत त्यांनी या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. एकीकडे भाजपमध्ये प्रवेश, तर दुसरीकडे काँग्रेस नेतृत्वाविषयी व्यक्त केलेला आदर, यामुळे प्रज्ञा सातव यांची भूमिका सध्या राज्याच्या राजकारणात विशेष चर्चेचा विषय ठरत आहे.

___