Reservation for Amravati mayor’s post next week : अमरावती महापौरपदाचे आरक्षण येत्या आठवड्यात; सर्वसाधारण महिला प्रवर्गाची शक्यता
Amravati अमरावती महापालिका निवडणुकीच्या तयारीला वेग आला असून, महापौरपदाच्या आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकूण २२ प्रभागांतून ८७ सदस्यपदांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अमरावती महापालिकेतील नवीन महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव राहण्याची शक्यता आहे.
राज्याचा नगर विकास विभाग रोटेशन पद्धतीने राज्यातील २९ महानगरपालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण जाहीर करणार आहे. त्यानुसार अमरावती महापालिकेच्या १७व्या महापौरपदासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गाचे आरक्षण लागू होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गासाठीही लागू होऊ शकते, असे संकेतही मिळू लागले आहेत.
BJP OBC wing : डॉ. रणजीत पाटलांचे काम केल्यामुळे डावलले, हा आरोप निराधार
१० मार्च १९९२ ते ८ मार्च २०२२ या ३० वर्षांच्या कालावधीत अमरावती महापालिकेचे १६ महापौर झाले आहेत. ९ मार्च २०२२ पासून आतापर्यंत महापालिकेचा कारभार प्रशासक राजवटीखाली सुरू आहे. १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान झाल्यानंतर १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने १९ डिसेंबर २०२६ रोजी राज्य शासनाकडून राजपत्राद्वारे अधिसूचना जारी केली जाणार आहे. त्यानंतर नगर विकास विभागाने जाहीर केलेल्या आरक्षणानुसार अमरावती महापालिकेच्या १७व्या महापौरपदावर निवड होणार आहे. नवा महापौर कोण होणार, हे संबंधित राजकीय पक्षाच्या संख्याबळावर अवलंबून राहील.
Devendra Fadnavis : देवाभाऊ! अजब तुझे सरकार; शेतकरी फिरे दारोदार
अमरावती महापालिकेवर कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार, हे १६ जानेवारी २०२६ रोजी स्पष्ट होईल. सर्वच प्रमुख राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती व पक्षनेते ही महत्त्वाची पदे काबीज करण्यासाठी किमान ४४ नगरसेवकांचे संख्याबळ आवश्यक असणार आहे.
आतापर्यंत महापौरपद भूषविणारे (१६)
डॉ. देवीसिंह शेखावत : १० मार्च १९९२ ते २० मार्च १९९३
प्रभाकर सव्वालाखे : ३० मार्च १९९३ ते १९ मार्च १९९४
गोविंद अग्रवाल : २० मार्च १९९४ ते २० मार्च १९९५
विद्याताई देशपांडे : २० मार्च १९९५ ते २० मार्च १९९६
किरणताई महल्ले : ९ मार्च १९९६ ते ९ मार्च १९९७
प्रवीणआप्पा काशीकर : १० मार्च १९९७ ते २० मार्च १९९८
नितीन वानखडे : २० मार्च १९९८ ते १९ मार्च १९९९
विलास इंगोले : १९ मार्च १९९९ ते ८ मार्च २००२
दीपाली गवळी : ९ मार्च २००२ ते १८ फेब्रुवारी २००५
मिलिंद चिमोटे : १८ फेब्रुवारी २००५ ते ८ मार्च २००७
अशोक डोंगरे : ९ मार्च २००७ ते ३० नोव्हेंबर २००९
ॲड. किशोर शेळके : १ डिसेंबर २००९ ते ८ मार्च २०१२
वंदना कंगाले : ९ मार्च २०१२ ते ८ सप्टेंबर २०१४
चरणजितकौर नंदा : ९ सप्टेंबर २०१४ ते ८ मार्च २०१७
संजय नरवणे : ९ मार्च २०१७ ते २१ नोव्हेंबर २०१९
चेतन गावंडे : २२ नोव्हेंबर २०१९ ते ८ मार्च २०२२








