Prataprao Jadhav : केंद्रात भाजपसोबत सत्तेत; महापालिकेत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचे आवाहन

Union Minister of State criticises BJP leaders in Akola : केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची अकोल्यातील भाजप नेत्यांवर टीका

Akola गेल्या पंधरा वर्षांपासून अकोला महापालिकेवर सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाने शहराची मोठ्या प्रमाणावर बकाल अवस्था केली असल्याचा आरोप करीत, शिवसेना नेते तथा केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सोमवारी भाजपवर जोरदार टीका केली. केवळ विकासाच्या गप्पा मारणाऱ्या या सत्ताधाऱ्यांना यावेळी धडा शिकवा आणि महापालिकेत परिवर्तन घडवा, असे आवाहनही त्यांनी मतदारांना केले.

शिवसेना शिंदे गटाचे उमेदवारांच्या प्रचारार्थ सोमवार, १२ जानेवारी रोजी जुने शहरात आयोजित जाहीर सभेत ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. केंद्रात भाजपसोबत सत्तेत असलो, तरी स्थानिक पातळीवर भाजपच्या अपयशी कारभाराला पाठिंबा देता येणार नाही, असे स्पष्ट मत त्यांनी मांडले. गेल्या अनेक वर्षांत अकोला शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांची अवस्था दयनीय झाली आहे. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी विकासाच्या नावाखाली फक्त घोषणाच केल्या, प्रत्यक्षात शहराचा सर्वांगीण विकास झाला नाही, असा आरोप त्यांनी केला.

Nitesh Rane : महापौर ‘आय लव्ह महादेव’ म्हणणारा असावा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक करताना प्रतापराव जाधव म्हणाले की, एकनाथ शिंदे हे सर्वसामान्य जनतेच्या दु:खात धावून जाणारे सच्चे शिवसैनिक आहेत. त्यांनी दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करून दाखवला आहे. राज्यातील महिलांसाठी ‘लाडकी बहीण’ योजना सुरू करून त्यांनी मातृशक्तीला दिलेले आश्वासन प्रत्यक्षात उतरवले. आम्ही फक्त बोलत नाही, तर दिलेला शब्द पाळणारे आहोत, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

Vanchit Bahujan Aghadi : वंचितचा ‘एकला चलो रे’ प्रयोग कितपत यशस्वी?

अकोला महापालिकेत शिवसेनेला संधी मिळाल्यास शहराचा विकास प्राधान्याने केला जाईल. पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि नागरी समस्या सोडवण्यासाठी ठोस धोरण राबवले जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. शहराच्या विकासासाठी प्रामाणिक आणि लोकाभिमुख नेतृत्वाची गरज असून, ती शिवसेनेच्या माध्यमातूनच पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या सभेला शिवसेनेचे उपनेते व माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया, जिल्हाप्रमुख माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, जिल्हाप्रमुख चंद्रशेखर पांडे गुरुजी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.