Controversy erupts over statement on Amruta Fadnavis : महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांनीही गायिकेला सुनावले; कायदेशीर कारवाईचे संकेत
Mumbai गायिका अंजली भारती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे राज्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. अंजली भारती यांनी अमृता फडणवीस यांच्या संदर्भात अत्यंत खालच्या दर्जाची आणि अपमानास्पद भाषा वापरल्याचे समोर आले असून, या विधानाचा सर्वच स्तरांतून निषेध केला जात आहे. विशेष म्हणजे, सत्ताधारी महायुतीसह विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही ही भाषा लज्जास्पद असल्याचे म्हटले आहे.
या प्रकरणी केवळ सत्ताधारी पक्षानेच नव्हे, तर विरोधी पक्षांच्या महिला नेत्यांनीही आक्रमक पवित्रा घेतला आहे. “सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल गलिच्छ भाषेत जे वक्तव्य केले आहे, त्याचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडी जाहीर निषेध करते,” असे मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केले.
भाजपच्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेसमोर उभे राहून अशा प्रकारचे वक्तव्य करणे हे सामाजिक अधःपतन असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आणि या प्रकरणी कायदेशीर प्रहार करण्याचा इशारा दिला. शिवसेना नेते संजय निरुपम यांनीही या विधानाची निंदा केली असून, कोणत्याही महिलेबद्दल बलात्काराची वकिली करणे ही विकृती असल्याचे म्हटले आहे.
अंजली भारती या युट्युबवर ‘दीदी अंजली भारती’ या नावाने प्रसिद्ध असून, त्यांचे अनेक गाण्यांचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर आहेत. एका सार्वजनिक सभेमध्ये बोलताना त्यांनी अमृता फडणवीस यांच्यावर वैयक्तिक टीका करताना मर्यादा ओलांडली. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यातील भाषेवरून जनक्षोभ उसळला. कोणावरही राजकीय टीका करण्याचा अधिकार असला तरी, ती करताना वैयक्तिक चारित्र्यहनन आणि हिंसेचे समर्थन करणे चुकीचे असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.
महिलांच्या सन्मानाला ठेच पोहोचवणारे आणि चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी अंजली भारती यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सोशल मीडियावर या विधानाचा निषेध करणारे हॅशटॅग ट्रेंड होत असून, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अशा प्रकारची वक्तव्ये खपवून घेतली जाणार नाहीत, असा सूर उमटत आहे.








