Landless people demand the immediate allotment of revenue, forest, and residential land titles : महसूल, वन व निवासी जमिनींचे पट्टे तातडीने देण्याची मागणी
Buldhana छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या करण्यात आलेल्या सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून भूमी मुक्ती मोर्चा व बहुजन मुक्ती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर ‘न्याय दो’ आंदोलन करण्यात आले. विविध प्रलंबित प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली.
आंदोलनकर्त्यांनी भूमिहीनांना महसूल, वन व निवासी जमिनींचे पट्टे तातडीने देण्याची मागणी केली. तसेच शेतकरी व भूमिहीनांची शंभर टक्के कर्जमाफी करावी, जिल्हा प्रशासनाने प्रस्तावित केलेल्या अतिक्रमित जमिनीवरील सौर ऊर्जा प्रकल्पांना स्थगिती द्यावी, जिगाव प्रकल्पग्रस्त अतिक्रमणधारकांना प्रतिकुटुंब २० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान द्यावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली.
Fake birth certificate : अमरावती मनपातील जन्म प्रमाणपत्र प्रकरण; घोटाळा की तांत्रिक बिघाड?
याशिवाय जिल्हा वनहक्क समितीने अपात्र ठरविलेल्या तसेच उपविभागीय वनहक्क समिती आणि ग्रामस्तरीय समित्यांकडे प्रलंबित असलेल्या वनहक्क दावेदारांना चालू खरीप हंगामात शेतीची मशागत व पेरणी करण्यासाठी वन विभागाचा हस्तक्षेप थांबवावा, अशीही मागणी आंदोलकांनी केली.
आंदोलनादरम्यान प्रशासनाच्या वतीने ३० जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांसोबत मागण्यांबाबत बैठक आयोजित करण्यात येईल, असे लेखी आश्वासन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आले.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप अंभोरे यांच्या नेतृत्वाखाली सिद्धार्थ धंदरे, उद्धव मुळे, सारंगधर वाकोडे, भरत मुंडे, दीपक कस्तुरे, गजानन जाधव, ज्ञानदेव मिसाळ, भगवान गवई, शेषराव चव्हाण, सलीमभाई, रामेश्वर चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने भूमिहीन शेतकरी, शेतमजूर आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले.








