Rajmata Jijau : ४११ कोटींचा विकास आराखडा फक्त कागदावरच; ‘मातृतीर्थ’ सिंदखेड राजाकडे शासनाचे दुर्लक्ष

₹411-crore Sindkhed Development Plan remains only on paper : स्वराज्याच्या जननीच्या जन्मभूमीची परवड; घोषणांचा पाऊस अन् विकासाचा दुष्काळ

Sindkhed raja अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या नावाचा जयघोष प्रत्येक राजकीय व्यासपीठावरून केला जातो. मात्र, ज्या भूमीत स्वराज्याची जननी जन्माला आली, त्या ‘मातृतीर्थ’ सिंदखेड राजाच्या विकासाबाबत शासन कमालीचे उदासीन असल्याचे धक्कादायक चित्र आहे. निवडणुकीच्या काळात जिजाऊ-शिवरायांच्या नावावर मते मागणाऱ्या सत्ताधाऱ्यांना या ऐतिहासिक नगरीच्या दुरवस्थेचा विसर पडल्याची भावना नागरिक आणि शिवप्रेमींमधून व्यक्त होत आहे.

सिंदखेड राजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने वेळोवेळी मोठ्या घोषणा केल्या. कधी २५० कोटी, तर कधी ३०० कोटी आणि आता ४११ कोटी रुपयांचा विकास आराखडा जाहीर करण्यात आला. मात्र, हे कोट्यवधींचे आकडे केवळ सरकारी कागदांवरच मर्यादित राहिले असून जमिनीवर विकासाचा एकही दगड हललेला नाही. ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन, पर्यटनासाठी पायाभूत सुविधा आणि शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठीचा निधी नक्की कुठे अडकला आहे, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. केवळ घोषणांचा पाऊस पाडून जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम शासन करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

Ladaki Bahin Yojana : कुटुंबात शासकीय नोकरदार नसतानाही ‘लाडकी बहीण’चे अर्ज नामंजूर; ई-केवायसीतील चुकांमुळे लाभार्थींवर अन्याय

शहरातील लखुजीराव जाधवांचा राजवाडा, रंगमहाल, सावकार वाडा आणि मोती तलाव यांसारख्या अमूल्य ऐतिहासिक वास्तूंची आज मोठी पडझड होत आहे. पुरातत्व विभाग आणि राज्य शासन यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे या वास्तूंचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पर्यटनासाठी राज्यभरातून लाखो भाविक येथे येतात, मात्र त्यांना साध्या मूलभूत सुविधाही मिळत नाहीत. सुसज्ज पार्किंग, भक्तनिवास आणि निवारा शेड नसल्याने पर्यटकांची मोठी गैरसोय होते. या तीर्थक्षेत्राला ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून दर्जा देण्याची मागणी वर्षानुवर्षे प्रलंबित आहे, मात्र केंद्र आणि राज्य शासन केवळ एकमेकांकडे बोट दाखवण्यात धन्यता मानत आहेत.

KDMC Election 2026 : डोंबिवलीत मनसेच्या बड्या नेत्याने धरलं कमळ; आता ‘मोठा मित्र’ही पक्षप्रवेशाच्या तयारीत?

दरम्यान, आज १२ जानेवारी रोजी जिजाऊ जन्मोत्सवाच्या निमित्ताने एक विशेष मागणी जोर धरत आहे. आषाढी एकादशीला पंढरपूर येथे जशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा होते, तशीच शासकीय महापूजा सिंदखेड राजा येथेही व्हावी, अशी शिवप्रेमींची इच्छा आहे. स्वराज्याचे स्वप्न पाहणाऱ्या राजमातेला शासनस्तरावर योग्य सन्मान मिळावा आणि ४११ कोटींचा निधी कागदावरून प्रत्यक्षात कृतीत यावा, अशी जनतेची मागणी आहे. जिजाऊंच्या नावाने सत्तेच्या पायऱ्या चढणाऱ्यांना आता त्यांच्याच जन्मभूमीच्या विकासाचा विसर का पडला, असा जळजळीत सवाल शिवभक्त विचारत आहेत.