Politics heats up over the land for the Government Medical College in Amravati : रवी राणांची विरोधकांवर टीका; अमरावतीतील शासकीय मेडिकल कॉलेजच्या जागेवरून राजकारण तापले
Amravati बडनेरा विधानसभा मतदारसंघातील कोंडेश्वर परिसरातील वडद (आलियाबाद) येथे प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेवरून जिल्ह्यातील राजकारण तापले असून, आमदार रवी राणा यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली आहे. संबंधित प्रकल्प याच ठिकाणी उभारला जाणार असून, स्थान बदलाचा कोणताही प्रश्न उद्भवत नाही, असे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले.
राणा यांनी सांगितले की, या प्रकल्पाबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पाला हिरवी झेंडी दिली असून, जागेचा ताबाही प्रशासनाकडे आहे. त्यामुळे आता या कामाला वेग मिळणार असल्याचा दावा त्यांनी केला.
वनविभागाच्या जागेबाबत अडथळा नाही पर्यावरणाच्या मुद्द्यावरून उपस्थित केल्या जाणाऱ्या शंकांना उत्तर देताना राणा म्हणाले की, मेडिकल कॉलेज उभारणीमुळे वन विभागाच्या कामकाजावर किंवा पर्यावरणावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीसारख्या वनक्षेत्रबहुल जिल्ह्यांमध्येही असे प्रकल्प यशस्वीपणे राबविण्यात आले आहेत. मग वडद येथेच विरोध का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
Buldhana Politics : महायुतीत ‘पॉवर बॅलन्स’चा प्रश्न; राष्ट्रवादी आघाडीवर, भाजप अस्वस्थ
या मुद्द्यावरून राजकारण करणाऱ्यांवर टीका करताना राणा आक्रमक झाले. ‘काही जण अनावश्यक वाद निर्माण करून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्यांचे केस पांढरे झाले आहेत, त्यांनी दिवसा स्वप्न पाहणे सोडून विकासाच्या कामांकडे लक्ष द्यावे,’ असा टोला त्यांनी नाव न घेता लगावला. नवीन प्रकल्पांचे स्वागत आहे; मात्र सुरू असलेल्या लोकहिताच्या कामात अडथळे आणू नयेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Annabhau Sathe Statue : अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्यासाठी ‘डफडे बजाव’, पण निर्णयाचा ठावठिकाणा नाही
विकासकामे मार्गी लावण्याचा मला प्रदीर्घ अनुभव असून, मुख्यमंत्र्यांचे सहकार्य लाभत असल्याने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प वेगाने पुढे जात आहे, असे राणा यांनी सांगितले. या मेडिकल कॉलेजमुळे बडनेरा परिसराचा चेहरामोहरा बदलणार असून, आरोग्य सुविधांमध्ये मोठी सुधारणा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.








