Reality of unemployment : एमबीए, एमसीए आणि अभियंते पोलीस शिपाई भरतीसाठी रांगेत !

police-recruitment-highly-educated-candidates-apply-unemployment-reality : १७४ जागांसाठी कुठे ८१३४ तर कुठे ९७ जागांसाठी तब्बल १०६७९ उमेदवार

Mumbai: राज्यात वाढत्या बेरोजगारीचे गंभीर चित्र समोर आले असून केवळ बारावी उत्तीर्ण ही किमान पात्रता असलेल्या पोलीस शिपाई पदासाठी उच्चशिक्षित तरुण मोठ्या संख्येने मैदानात उतरले आहेत. बीड जिल्हा पोलीस दलातील १७४ रिक्त जागांसाठी तब्बल ८१३४ उमेदवारांनी अर्ज केल्याने स्पर्धेची तीव्रता स्पष्ट झाली आहे. अर्जांची छाननी केल्यानंतर २६५३ उमेदवार पदवीधर असल्याचे निष्पन्न झाले आहे. कला शाखेतील १४२८, विज्ञान शाखेतील ५८२ आणि वाणिज्य शाखेतील ३२१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. याशिवाय अभियांत्रिकी क्षेत्रातील ४७ आणि औषधनिर्माण क्षेत्रातील १९ उमेदवारही या भरती प्रक्रियेत सहभागी झाले आहेत.

केवळ पदवीधरच नव्हे तर पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले ३८८ उमेदवारही या स्पर्धेत उतरले आहेत. यात १९५ एम.ए., ५९ एम.कॉम. आणि ५६ एम.एससी. पदवीधारकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे कॉर्पोरेट क्षेत्रात संधी शोधणारे १९ एमबीए पदवीधर देखील पोलीस शिपाई पदासाठी प्रयत्नशील आहेत. उच्च शिक्षण पूर्ण करूनही अपेक्षित रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नसल्याने सरकारी नोकरीकडे वळण्याची वेळ आल्याचे अनेक उमेदवारांनी सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण आणि रोजगार यातील दरी अधिकच ठळकपणे समोर आली आहे.

Devendra fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आठवडाभरात दुसऱ्यांदा दिल्लीत!

बीड जिल्ह्यातील भरती प्रक्रिया पारदर्शक आणि काटेकोर पद्धतीने पार पाडण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत कानवट यांनी विशेष खबरदारी घेतली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उमेदवारांची चाचणी घेतली जात आहे. मैदानात उतरण्यापूर्वी उत्तेजित पदार्थांचे सेवन करणाऱ्या एका उमेदवाराला तंबी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच पोलीस दलात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवणाऱ्या एजंटांपासून सावध राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

दरम्यान, परभणी जिल्ह्यातही याच स्वरूपाचे चित्र दिसून आले आहे. परभणी जिल्हा पोलीस दलातील केवळ ९७ जागांसाठी तब्बल १०६७९ अर्ज दाखल झाले आहेत. आजपासून या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून सुमारे महिनाभर ही प्रक्रिया चालणार आहे. ८५ सीसीटीव्ही कॅमेरे आणि आरएफआयडी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उमेदवारांवर नजर ठेवली जात आहे. बीडमध्ये घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर दोन वैद्यकीय पथके परभणीत तैनात करण्यात आली आहेत. दररोज सुमारे एक हजार उमेदवारांचे नियोजन करण्यात येत आहे.

Chandrapur BJP : जोरगेवारांच्या हस्तक्षेपामुळे चंद्रपूर भाजपात गटबाजीचा भडका

उच्चशिक्षित तरुण मोठ्या प्रमाणावर पोलीस शिपाई पदासाठी अर्ज करत असल्याचे चित्र राज्यातील रोजगाराच्या संधींबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत आहे. शिक्षणाचा स्तर वाढत असताना रोजगार निर्मितीचा वेग त्याच प्रमाणात वाढत नसल्याचे वास्तव या भरती प्रक्रियेतून समोर आले आहे. आगामी काळात राज्यातील रोजगार धोरण आणि कौशल्याधारित संधी याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.