Mehkar Bar Association steps up protest against Girish Mahajan : प्रजासत्ताक दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव टाळल्याचा आरोप; नाशिकमधील भाषणावरून संतापाची लाट
Mehkar प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमात भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव भाषणात न घेतल्याचा गंभीर आरोप करत, राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात मेहकर येथील वकील संघाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. याप्रकरणी महाजन यांचा जाहीर निषेध करत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी मंगळवारी मेहकर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देण्यात आली आहे.
२६ जानेवारी २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात गिरीश महाजन यांनी भाषण केले. निवेदनात नमूद केल्यानुसार, प्रजासत्ताक दिन हा संविधानाच्या अंमलबजावणीचा दिवस असतानाही महाजन यांनी आपल्या संपूर्ण भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतले नाही. ही बाब तेथील वनविभागाच्या अधिकारी माधुरी जाधव यांनी त्यांच्या लक्षात आणून दिल्याचेही निवेदनात म्हटले आहे. संविधानामुळेच देश एकसंध असताना, महामानवाचे नाव जाणीवपूर्वक न घेणे हा संविधानाचा अवमान असल्याची भावना वकील संघाने व्यक्त केली आहे.
मेहकर येथील वकील संघाने या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. २७ जानेवारी रोजी वकील मंडळाने एकत्र येत पोलीस प्रशासनाला निवेदन दिले. “ज्या संविधानामुळे आज देश चालतो, त्या संविधानाच्या निर्मात्याचा उल्लेख टाळणे ही राष्ट्रीय कर्तव्याची च्युती आहे,” असे मत निवेदनात व्यक्त करण्यात आले आहे. संबंधित मंत्र्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर अॅड. अनंतराव वानखेडे, अॅड. विष्णू सरदार, अॅड. एस. भालेराव, अॅड. गजानन लांडगे यांच्यासह अनेक नामवंत वकिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
प्रजासत्ताक दिनी घडलेल्या या प्रकारामुळे केवळ नाशिकच नव्हे, तर विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांनी या मुद्द्यावरून महायुती सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. भाजपचे संकटमोचक मानले जाणारे गिरीश महाजन या वादावर आता काय स्पष्टीकरण देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मेहकर पोलिसांनी हे निवेदन स्वीकारले असून, प्राथमिक चौकशीनंतर पुढील कायदेशीर दिशा ठरवण्यात येईल असे सांगितले आहे. मात्र, वकिलांच्या या आक्रमक भूमिकेमुळे हा वाद येत्या काळात अधिक चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.








