rohit-pawar-vsr-flight-ajit-pawar-plane-crash-warning-big-leader-travel-claim : व्हीएसआर विमानप्रकरणी रोहित पवारांचा गंभीर इशारा
Mumbai : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर उभ्या राहिलेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी व्हीएसआर कंपनीच्या विमानांबाबत पुन्हा गंभीर इशारा दिला आहे. व्हीएसआर कंपनीच्या विमानांमध्ये तांत्रिक त्रुटी असल्याचा दावा करत त्यांनी या कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी आधीपासूनच केली होती. आता त्यांनी एका बड्या राजकीय नेत्याने धोका असूनही या कंपनीच्या विमानातून प्रवास केल्याचा दावा करून नव्या चर्चेला तोंड फोडले आहे.
दिल्लीमध्ये एका कार्यक्रमानंतर महाराष्ट्रातील एक प्रभावशाली नेता व्हीएसआर कंपनीच्या विमानाने परत आल्याचा दावा रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत केला. या प्रवासादरम्यान प्रायव्हेट चार्टर टर्मिनलवर व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांनी स्वतः त्या नेत्याचे स्वागत केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी संबंधित नेत्याच्या सहाय्यकाला काही कागदपत्रे देण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला. विशेष म्हणजे, अजित पवार यांच्या अपघातातील मृत पायलट कपूर यांचा मुलगा त्या विमानाचा पायलट होता, असा दावा करत पवार यांनी या संपूर्ण प्रकरणाबाबत शंका उपस्थित केली आहे.
Vijay Wadettiwar : अख्खा सातबारा कोरा करा, दोन लाखांनी काय होणार? काँग्रेस नेत्याचा सवाल
रोहित पवार यांनी स्पष्ट शब्दांत इशारा देताना सांगितले की, अजित पवार अपघात प्रकरण हलक्यात घेऊ नये. व्हीएसआर कंपनीवर अंधविश्वास ठेवणे धोकादायक ठरू शकते. “स्वतःची काळजी घ्या आणि अशा विमानांचा वापर टाळा,” असे आवाहन त्यांनी केले.
याशिवाय, व्हीएसआर कंपनीचे महाराष्ट्रातील काही मोठ्या प्रकल्पांशी संबंध असल्याचा आरोपही त्यांनी केला. आंध्र प्रदेशमध्ये ज्या प्रकारे आर्थिक संबंधांच्या माध्यमातून मोठ्या प्रकल्पांमध्ये मध्यस्थी केली गेली, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही अशा भूमिका पार पाडल्या जात असल्याची माहिती समोर येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
Water shortage : दुसरबीडमध्ये पाणी पेटले! गटारी व रस्त्यांच्या प्रश्नावर ग्रामस्थ आक्रमक
दरम्यान, या प्रकरणात अद्याप अधिकृत तपास अहवालाची प्रतीक्षा सुरू असून, विमान अपघाताबाबत नागरी विमान वाहतूक अपघात तपास संस्था (एएआयबी)चा अहवाल येणे बाकी आहे. मात्र, इतक्या गंभीर आरोपांनंतरही सत्ताधारी यंत्रणा शांत असल्याची टीका करत रोहित पवार यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
या सर्व आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून, व्हीएसआर कंपनी आणि संबंधित प्रकरणांबाबत पुढील काळात काय उलगडे होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








