संघाचा विजयादशमी सोहळा, सरसंघचालकांचा काँग्रेसवरही निशाणा
Nagpur भारत हा कोट्यवधी लोकांचा आणि विविध संस्कृतींचा देश आहे. समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करणे तार्किक असले, तरी केवळ प्रसिद्धी आणि राजकीय लाभासाठी समाजात फूट पाडणे पूर्णपणे अयोग्य आहे, असे स्पष्ट आणि रोखठोक प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. संघाच्या शताब्दी वर्षाचे समापन आणि विजयादशमी सोहळ्याप्रसंगी रेशीमबाग मैदानावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
पुढे बोलताना डॉ. भागवत म्हणाले की, आंदोलन करणारा वर्ग किंवा समाज कोणताही असो, देशात कायदा आणि संविधान हेच सर्वांपेक्षा मोठे आहे. संविधानाच्या माध्यमातूनच देशाचा कारभार चालतो, त्यामुळे आंदोलन करताना आपसात कटुता, द्वेष आणि वैमनस्य निर्माण होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेण्याची गरज आहे. आपल्या भावना कितीही तीव्र असल्या तरी त्या संविधान आणि कायद्याच्या चौकटीतच व्यक्त झाल्या पाहिजेत तसेच आपली भाषा, कार्य, व्यवहार आणि शिष्टाचाराच्या मर्यादांचे पालन झाले पाहिजे. आपली मतपेढी वाढवताना किंवा राजकीय लाभ मिळवताना कोणी दुखावणार नाही आणि आपसात द्वेष निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी या वेळी केले.
मुनगंटीवार म्हणाले, पदवीधरांचा हुंकार विधानपरिषदेत घुमवा, सुधाकर कोहळेंना बहुमताने निवडून द्या !
संविधानाचा संदर्भ देत डॉ. भागवत म्हणाले की, आपल्या देशाच्या संविधानात आपण स्वतःला केवळ प्रजा म्हणून नाही, तर सर्व विविधतेसह भावनात्मकदृष्ट्या एकरस समाज म्हणून म्हणजेच आम्ही भारताचे लोक असे परिभाषित केले आहे. या भावनात्मक संबंधाला निरंतर अधिक दृढ करण्याची दिशा संविधानाच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्पष्टपणे सांगितली आहे. भारतातील भाषा, जात, प्रांत, मत, पंथ, खानपान आणि रीति-रिवाजांची विविधता जेवढी स्वाभाविक आहे, तितकीच संपूर्ण अस्तित्वाची एकता हे शाश्वत सत्य आहे. त्यामुळे या सर्व विविधतेला सन्मानाने आणि आपलेपणाने स्वीकारणारा विचारच आपल्या एकतेचा आधार बनू शकतो, असे प्रतिपादन त्यांनी केले.








