BJP office-bearer enters Municipal Council with MIM’s support : कागदोपत्री भांडण, प्रत्यक्षात साटेलोटे; आमदार साजिद खान पठाण यांचा आरोप
Akola एकमेकांवर सभांमध्ये जहरी टीका करणारे, जाहीरपणे देशद्रोही ठरवणारे आणि मतदारांसमोर कट्टर विरोधक असल्याचा आव आणणारे ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) आणि भारतीय जनता पक्ष प्रत्यक्षात मात्र सत्तेसाठी एकाच माळेचे मणी असल्याचा गंभीर आरोप पश्चिम अकोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांनी केला आहे.
अकोट नगरपरिषदेत घडलेल्या सत्तानाट्यावरून एमआयएम आणि भाजप हे कागदोपत्री वेगळे असले, तरी पडद्यामागून ‘भाऊ–भाऊ’ असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी सोमवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली.
५ जानेवारी रोजी अकोट नगर परिषदेत सत्तास्थापनेसाठी ‘अकोट नगर विकास आघाडी’च्या नावाखाली भाजप आणि एमआयएमच्या नगरसेवकांनी हातमिळवणी केली. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपला एमआयएमची आवश्यकता होती, तर सत्तेच्या मोहापोटी एमआयएमने भाजपच्या खांद्यावर बंदूक ठेवली, असा आरोप आमदार पठाण यांनी केला. हा प्रकार उघडकीस येताच राज्यभरातून तीव्र संतापाची लाट उसळली आणि दोन्ही पक्षांवर दुटप्पी राजकारण केल्याचा आरोप होऊ लागला.
Manoj Jarange : मनोज जरांगे यांचा उद्धव ठाकरेंना जाहीर पाठिंबा; मुंबई महापालिकेत ठरणार ‘गेमचेंजर’?
एकीकडे सभागृहात आणि जाहीर सभांमध्ये एकमेकांविरोधात विखारी भाषेत टीका, तर दुसरीकडे सत्तेसाठी एकाच ताटात जेवण—या ढोंगी राजकारणामुळे मतदारांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला. वाढता विरोध पाहता दोन्ही पक्षांच्या प्रदेशस्तरीय नेत्यांनी पत्रे आणि नोटिसा काढत ‘डॅमेज कंट्रोल’चा देखावा उभा केला आणि प्रकरण थंड करण्याचा प्रयत्न केला.
९ जानेवारी रोजी एमआयएमच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत आघाडीतून बाहेर पडल्याचे जाहीर केले आणि स्वतंत्र गट स्थापन केल्याचे दाखवण्यात आले. मात्र हा सारा प्रकार केवळ कागदोपत्री असल्याचे सोमवारी पुन्हा एकदा स्पष्ट झाले, असा आरोपही त्यांनी केला.
वाद शमतो न शमतो, तोच एमआयएमच्या पाच नगरसेवकांनी भाजप पदाधिकारी बरेठिया यांना पाठिंबा देत थेट नगर परिषद सभागृहात स्वीकृत सदस्य म्हणून एन्ट्री मिळवून दिली. कागदोपत्री वेगळा गट दाखवून प्रत्यक्षात भाजपच्या फायद्यासाठी निर्णायक भूमिका बजावण्यात आली. यामुळे एमआयएमचा खरा चेहरा जनतेसमोर आला असल्याचा दावा आमदार पठाण यांनी केला.
“एमआयएम आणि भाजप एकमेकांचे कट्टर शत्रू असल्याचा देखावा करतात. मात्र सत्ता, पदे आणि स्वार्थासाठी हे दोन्ही पक्ष एकमेकांचे हात घट्ट धरून आहेत. मतदारांची दिशाभूल करणे, समाजात ध्रुवीकरण घडवणे आणि निवडणुकीपुरते भांडणाचे नाटक करणे, हा यांचा जुना खेळ आहे,” असा घणाघात आमदार साजिद खान पठाण यांनी केला.
Sudhir mungatiwar : आम्हाला राम प्रिय अन् काँग्रेसला ‘रम’ प्रिय
या प्रकरणामुळे अकोटच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, ‘एमआयएम–भाजप साटेलोटे’ हा मुद्दा आता उघडपणे चर्चेत आला आहे. जनता सर्व काही पाहत असून, येणाऱ्या निवडणुकांमध्ये या दुटप्पी राजकारणाला चोख प्रत्युत्तर देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
अंबरनाथ येथे भाजपासोबत आघाडीत सामील झालेल्या १२ नगरसेवकांवर काँग्रेसने थेट निलंबनाची कारवाई केली. अकोटमध्ये मात्र साटेलोटे उघडकीस येऊनही भाजप आणि एमआयएमकडून केवळ नोटिसा काढण्याचे ढोंग सुरू आहे. काँग्रेसप्रमाणे नगरसेवकांवर थेट कारवाई करण्याचे धाडस भाजप आणि एमआयएमच्या नेतृत्वाने दाखवावे, असे आव्हान आमदार साजिद खान पठाण यांनी दिले आहे.








