Alliance with BJP possible, but not with Eknath Shinde, Thackeray group MP clarifies : संजय राऊतांच्या स्पष्ट भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
Mumbai: कल्याण-डोंबिवली महापालिकेत मनसेने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युती केल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली असून, या निर्णयावरून विरोधी पक्षांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मनसेने विरोधात लढल्यानंतर थेट शिंदेसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. हा निर्णय स्थानिक पातळीवरील असून तिथल्या पदाधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आल्याचा दावा केला जात असला तरी ठाकरे गटाकडून त्याला स्पष्ट विरोध केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत अत्यंत परखड भूमिका मांडत मनसे – शिंदेसेना घरोब्यावर जोरदार टीका केली. कल्याण-डोंबिवली महापालिकेत मनसेने शिंदेसेनेसोबत केलेली युती उद्धव ठाकरे गटाला मान्य नसल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं. अस्थिरता असेल तिथे कधीकधी भाजपसोबत निर्णय घेण्याचा विचार होऊ शकतो, पण शिंदेसेनेसोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं ठाम विधान त्यांनी केलं आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.
Akola municipal corporation : अकोल्यात भाजपला रोखण्यासाठी ‘महाविकास आघाडी’ची जोरदार मोर्चेबांधणी!
संजय राऊत म्हणाले की, शह-कटशहाच्या राजकारणात नीतीमत्ता ओंडक्यासारखी वाहून जाऊ नये. केडीएमसीमध्ये जे काही घडलं ते मनसेची अधिकृत भूमिका नाही, असं सांगतानाच राज ठाकरे यांनाही हा प्रकार मान्य नसल्याचं त्यांनी नमूद केलं. या संपूर्ण प्रकरणावर राज ठाकरे यांच्याशी अंतर्गत चर्चा केली जाईल, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं. स्थानिक नेत्यांना युती करायचीच होती, तरी त्यांनी शिंदेसेनेसोबत अशी युती करायला नको होती, अशी स्पष्ट नाराजी त्यांनी व्यक्त केली.
शिंदे यांच्या बाबतीत आमची भूमिका कडवट आणि कठोर आहे, असं सांगत राऊत म्हणाले की, भाजप आणि शिंदे हे दोघे मिळून महापालिकेत सत्ता स्थापन करू शकतात. त्यामध्ये इतर पक्षांनी घुसखोरी करण्याचं कारण नव्हतं. मनसेच्या स्थानिक नेत्यांनी हा निर्णय का घेतला, हे आता समोर आलं असून या संदर्भात पक्षांतर्गत चर्चा केली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. मात्र मनसेने शिंदेसेनेसोबत केलेल्या युतीबाबत राज ठाकरे यांनी फेरविचार करावा का, हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय असल्याचं सांगत राऊत यांनी थेट भाष्य टाळलं.
Municipal Elections: मोठी खळबळ! अमरावतीच्या अचलपूरमध्ये भाजपा–एमआयएमची थेट युती
दरम्यान, उद्धव ठाकरे गटाच्या काही नगरसेवकांनीही केडीएमसीमध्ये शिंदेसेनेसोबत जाण्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती समोर आली होती. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, अशा प्रस्तावांना आम्ही थेट केराची टोपली दाखवतो. जिथे अत्यंत अस्थिरता आहे, तिथे पर्याय म्हणून भाजपसोबत निर्णयाचा विचार होऊ शकतो, पण शिंदेसेनेसोबत कधीही जाणार नाही, हीच आमची भूमिका असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा ठामपणे सांगितलं.
आज महापालिकांमधील महापौर पदासाठी आरक्षणाची सोडत निघत असतानाच संजय राऊत यांच्या या विधानामुळे राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कल्याण-डोंबिवली प्रकरणामुळे आधीच तापलेलं राजकारण राऊतांच्या आक्रमक भूमिकेमुळे आणखी चिघळण्याची चिन्हं दिसत असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणावर याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








