ऑक्टोबर ते जानेवारी देशात मोठ्या राजकीय घडामोडी
Mumbai नेहमीच आपल्या आक्रमक आणि धाडसी वक्तव्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा अत्यंत धक्कादायक भाकीत केले आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या ठाकरे बंधूंच्या संयुक्त आक्रमक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना राऊतांनी, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही लवकरच राजीनामा देऊन आपली बॅग पॅक करावी लागेल, असा थेट इशारा दिला आहे.
आज रविवारी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात ठाकरे बंधूंनी गर्जना मोर्चा हाक दिली आहे. या मोर्चाला काँग्रेसने पूर्ण पाठिंबा दर्शवला असून ज्येष्ठ नेते शरद पवार हेदेखील यामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती आहे. या मोर्चावर बोलताना राऊत म्हणाले की, माजी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना ज्याप्रमाणे राजीनामा द्यावा लागला, त्याच धर्तीवर आता मुख्य निवडणूक आयुक्तांना पद सोडावेच लागेल. हा मोर्चा केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाविरोधात मोठी राजकीय कलाटणी ठरणार आहे.
पुढे बोलताना राऊतांनी दावा केला की, ऑक्टोबर ते जानेवारी या चार महिन्यांत भारताच्या राजकारणात अभूतपूर्व व मोठ्या घडामोडी घडतील. जानेवारीपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही आपले पद सोडावे लागेल. ही केवळ कोणती भाकिते नसून दिल्लीतील मोदी सरकारच्या विरोधातील वाढती अस्वस्थता आणि देशभरातील विरोधाचे वातावरण पाहता ही आजची खरी परिस्थिती आहे. ठाकरे बंधूंचे एकत्र येणे आणि विरोधी पक्षांची मिळालेली भक्कम साथ यामुळे या मोर्चाकडे संपूर्ण राज्याचे नव्हे, तर देशाचे लक्ष लागले आहे.








