Otherwise, take land at market price, Sanjay Raut direct condition to Bihar government : नाहीतर बाजारभावाने जमीन घ्या संजय राऊतांची बिहार सरकारला थेट अट
Mumbai: मुंबईत ३० मजली बिहार भवन उभारण्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र आणि बिहारच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. बिहारचे मंत्री अशोक चौधरी यांनी मुंबईत बिहार भवन बांधूनच दाखवू, कोणाच्या बापात हिंमत असेल तर रोखून दाखवा, असे खुले आव्हान दिल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या विधानाचा तीव्र शब्दांत समाचार घेतला आहे. मुंबईत बिहार भवन उभारायचेच असेल, तर आधी बिहार सरकारने पाटण्यात महाराष्ट्र भवनासाठी ५ ते ६ एकर मोक्याची जागा द्यावी, अशी ठाम अट संजय राऊत यांनी घातली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला देशात कुठेही राहण्याचा आणि काम करण्याचा अधिकार दिला आहे, हे आम्हालाही माहीत आहे. मात्र बिहारच्या मंत्र्यांनी वापरलेली भाषा अत्यंत अयोग्य आणि आक्रमक आहे. मुंबईत आधीच अनेक राज्यांची भवने आहेत, पण ज्या पद्धतीने आव्हान देत वक्तव्य केले जात आहे, ते चुकीचे असून त्यामुळे विनाकारण वातावरण तापण्याचा धोका आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
Rahul Gandhi : जिथे भाजपला पराभव दिसतो, तिथे मतदारच गायब केले जातात
मुंबईत बिहार भवन उभारण्यावर थेट विरोध न करता संजय राऊत यांनी बिहार सरकारसमोर अटींचा प्रस्ताव ठेवला आहे. तुम्हाला मुंबईत बिहार भवन बांधायचे असेल, तर त्यासाठीची जमीन मुंबईतूनच घ्यावी लागेल. ती जमीन काही पाटण्यातून आणता येणार नाही. त्याच धर्तीवर आमचीही मागणी आहे की, बिहार सरकारने पाटण्यातील गोला रोड किंवा न्यू पाटलीपुत्र कॉलनीसारख्या मोक्याच्या आणि विकसित भागात महाराष्ट्रासाठी ५ ते ६ एकर जागा द्यावी. त्या जागेवर आम्ही ३० माळ्यांचे भव्य महाराष्ट्र भवन उभारू, असे संजय राऊत यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील अनेक लोक कामानिमित्त बिहारमध्ये, विशेषतः पाटण्यात ये-जा करतात. आम्हालाही तिथे महाराष्ट्र भवन उभे करायचे आहे. ही केवळ इमारतींची मागणी नसून सांस्कृतिक देवाणघेवाणीचा विषय आहे. जर बिहारी बांधव आमचे असतील, तर मराठी बांधवांनाही तुम्ही तिथे सन्मानाने स्वीकारले पाहिजे. ही देवाणघेवाण संपूर्ण देशभरात व्हायला हवी. मग फक्त मुंबईवरच आक्रमण का, असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला.
मुंबईतील जागेच्या प्रश्नावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, मुंबईची परिस्थिती लक्षात घ्यायला हवी. जर बिहार सरकारला जागा हवीच असेल, तर ती गौतम अदानींसारख्या खासगी विकासकांकडून बाजारभावाने विकत घ्यावी. सरकारकडून मोफत किंवा सवलतीच्या दरात जमीन हवी असेल, तर त्याआधी परस्पर सांस्कृतिक देवाणघेवाण झाली पाहिजे. महाराष्ट्रालाही बिहारमध्ये तशीच सुविधा मिळाली पाहिजे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
आम्ही संविधान मानणारे लोक आहोत, आकांत-तांडव करणारे नाही. मात्र मुंबईची अवस्था समजून न घेता जर आक्रमक आणि भडक वक्तव्ये केली, तर शहरातील वातावरण बिघडू शकते. त्यामुळे मुंबईबाबत बोलताना संयम बाळगावा, असा थेट इशाराही संजय राऊत यांनी बिहार सरकारला दिला आहे.
___








