व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Sanjay Raut : ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाने शिंदे घाबरले!

Sanjay Raut : ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाने शिंदे घाबरले!

sanjay-raut-on-eknath-shinde-kapil-sibal-supreme-court-shivsena-dhanushyaban :अमित शाहांच्या भेटी घेत आहेत, संजय राऊतांचा थेट घणाघात

Mumbai : शिवसेना कुणाची आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह कोणाचे, यावर सर्वोच्च न्यायालयात जोरदार सुनावणी सुरू असतानाच महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा आरोप- प्रत्यारोपांना उधाण आले आहे. ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल न्यायालयात ज्या ताकदीने आणि आक्रमकपणे ठाकरे गटाची बाजू मांडत आहेत, त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घाबरले असल्याचा दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. याच कारणामुळे शिंदे वारंवार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटी घेत असल्याचा आरोपही राऊत यांनी केला.

अलीकडेच मुंबई दौऱ्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली. या भेटीवरून संजय राऊत यांनी शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान ठाकरे गटाची बाजू भक्कम होत असल्याने शिंदे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच ते वारंवार अमित शाह यांच्या दारी जात आहेत, असा दावा राऊत यांनी केला.

Mohan Bhagwat On Muslim : ‘भारतात एकही मुस्लीम नको म्हणणारा हिंदू कदाचित हिंदू नसेल’

“अमित शाह त्यांना ‘काही बिघडणार नाही’ असा दिलासा देत असतील; पण अमित शाह हे देशाच्या सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे आहेत का?” असा थेट सवाल संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना उपस्थित केला. आपला संविधान आणि सर्वोच्च न्यायालयावर पूर्ण विश्वास असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ठाकरे गटाच्या बाजूने लागेल, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला. “शिवसेना ही केवळ आणि केवळ उद्धव ठाकरे यांचीच आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह चोरले असून, या चोरीमध्ये निवडणूक आयोग आणि अमित शाह यांनी साथ दिली,” असा गंभीर आरोप राऊत यांनी केला. या संपूर्ण प्रकरणामागे कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाल्याचा आरोपही त्यांनी पुन्हा केला.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी शिंदे गटाच्या भूमिकेसह विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयावरही जोरदार युक्तिवाद केला आहे. राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष हे दोन्ही वेगवेगळे असतात. विधिमंडळ पक्षाची भूमिका ही विधानसभेच्या कामकाजापुरती मर्यादित असते आणि त्याचे सदस्य मूळ राजकीय पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेले असतात, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला.

Supriya Sule : ‘राष्ट्रवादी पक्ष हा शरद पवारांचा होता, आजही आहे आणि…’

एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत बाहेर पडलेले आमदार हे शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले होते. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाला दिलेली मान्यता कायदेशीरदृष्ट्या चुकीची असल्याचा दावा ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आला आहे. आता या युक्तिवादाला शिंदे गटाचे वकील सर्वोच्च न्यायालयात काय प्रत्युत्तर देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, संजय राऊत यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे यांनी पलटवार केला आहे. “आम्हाला जनतेच्या न्यायालयानेच खरी शिवसेना म्हणून कौल दिला आहे,” असे शिंदे यांनी म्हटले आहे. शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हावरील या प्रदीर्घ कायदेशीर लढाईचा निकाल काय लागतो, याकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!