santosh-pandit-arrest-kothrud-pune-police-high-voltage-drama : कोथरूड भागात ‘हायव्होल्टेज ड्रामा’चा व्हिडीओ व्हायरल
Pune : महानगरपालिकेच्या विकासकामांवर सातत्याने सोशल मीडियातून टीका करणारे यू-ट्यूबर संतोष पंडित यांना कोथरूड पोलिसांनी मध्यरात्री अटक केली. बुधवारी रात्री साडेबारा ते एकच्या सुमारास पोलिसांचे पथक त्यांच्या कोथरूड येथील निवासस्थानी पोहोचले आणि त्यांना ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान रस्त्यावर काही काळ हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे.
पुणे महापालिकेच्या विविध विकासकामांमधील त्रुटींवर प्रश्न उपस्थित करणारे व्हिडीओ संतोष पंडित सातत्याने त्यांच्या समाजमाध्यमांवरील माध्यमातून प्रसिद्ध करत होते. कोथरूडमधील विकासकामांबाबत केलेल्या अशाच एका व्हिडीओमध्ये आक्षेपार्ह आणि अश्लील शेरेबाजी केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर त्यांच्या विरोधात नुकताच गुन्हा नोंदवण्यात आला होता.
यानंतर बुधवारी रात्री पोलिसांचे पथक दोन पांढऱ्या वाहनांमधून पंडित यांच्या घरी पोहोचले. पथकातील काही कर्मचारी साध्या वेशात असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर कुटुंबीयांनी संपूर्ण कारवाईचे चित्रण सुरू केले. पोलिस पंडित यांना वाहनात बसवत असताना त्यांनीही या कारवाईवर प्रतिक्रिया दिली. मध्यरात्री घरात पोलिस आल्याचा उल्लेख करत पंडित यांनी, “आमच्यासारख्यांची हीच लायकी आहे,” अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी एका पोलिस अधिकाऱ्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. “माझ्याकडून तुम्हाला त्रास झाला असेल किंवा मी सहकार्य केले नसेल, असे वाटत असेल तर माफी मागतो. अटक केल्याबद्दल धन्यवाद,” असेही ते म्हणाले.
Manoj Jarange : जरांगे पाटलांचा सरकारला चार दिवसांचा अल्टिमेटम !
पोलिसांच्या ताब्यात जाण्यापूर्वी पंडित यांनी आपला मोबाईल, वाहनाची किल्ली आणि कमरेचा पट्टा काढून कुटुंबीयांकडे दिला. पोलिसांना कोणत्या वस्तूंची आवश्यकता नाही, याची आपल्याला माहिती असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात आक्षेपार्ह भाषेतील व्हिडीओ प्रसारित केल्याप्रकरणीही पंडित यांच्याविरोधात तक्रार झाली होती. भाजपचे माजी स्थानिक नगरसेवक सुनील पांडे यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर डेक्कन पोलिसांनी संबंधित प्रकरणात गुन्हा नोंदवला होता.
Congress Vs Bjp : भारताच्या जीडीपीवरून काँग्रेस-भाजप आमनेसामने
पुण्यातील विकासकामांवरून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या पंडित यांच्या सोशल मीडिया पोस्ट यापूर्वीही चर्चेत आल्या आहेत. आता कोथरूड पोलिसांच्या मध्यरात्रीच्या कारवाईनंतर हा विषय पुन्हा चर्चेत आला असून, अटकेमागील नेमके आरोप आणि पोलिसांच्या पुढील कारवाईकडे लक्ष लागले आहे.








