Sharad Pawar : आठवड्याभरात शरद पवारांना दोन मोठे राजकीय धक्के

After BJP, now betrayal from an ally in the alliance : भाजपनंतर आता आघाडीतीलच मित्रपक्षाकडून दगा

Mumbai : महाराष्ट्रातील आगामी नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या तीव्र पक्षांतरांनी राज्याच्या राजकीय समीकरणांना वेगळे वळण मिळत आहे. महायुती असो किंवा महाविकास आघाडी दोन्ही आघाड्यांचे नेते आणि पदाधिकारी मोठ्या प्रमाणात विरोधी गटात प्रवेश करत आहेत. या हालचालींच्या झंझावातात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांना आठवड्याभरात सलग दोन मोठे राजकीय धक्के बसले आहेत.

काही दिवसांपूर्वी भाजपने त्यांचा गट फोडत मोठी खेळी केली होतीच; आता महाविकास आघाडीतीलच मित्रपक्ष काँग्रेसने शरद पवार गटाला अनपेक्षित दगा दिला असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील राजकारणाला नवीन कलाटणी मिळाली आहे.

धाराशिवमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. दोन वेळा तुळजापूर विधानसभा लढविलेले आणि स्थानिक राजकारणात वजनदार मानले जाणारे अशोक जगदाळे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

Bihar election result : ‘डेटा’ घसरला, जन सुराजचा ‘जन’ कुठे हरवला!

नगरपालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर हे पक्षांतर अधिक महत्त्वाचे ठरते. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर जगदाळे यांनी नळदुर्ग नगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला, तसेच भाजपच्या विरोधात महाविकास आघाडीच्या रूपातच ही लढत लढवणार असल्याचे स्पष्ट केले.

काँग्रेस नगराध्यक्ष पदासह १८ जागांवर लढेल, तर शिवसेना उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार गट प्रत्येकी एका जागेसाठी स्पर्धा करतील, अशी फॉर्म्युल्याची माहितीही त्यांनी दिली. या हालचालीमुळे महाविकास आघाडीत अंतर्गत अस्वस्थता वाढली असून शरद पवार गटाच्या स्थानिक संघटनात्मक बळाला धक्का बसल्याचे निरीक्षकांचे मत आहे.

Local Body Elections : नेत्यांचे मुंबईत बस्तान, स्थानिक उमेदवारांचे ‘वेट अॅण्ड वॉच’!

यापूर्वी सोलापुरात भाजपने शरद पवार गटावर मोठी राजकीय चाल खेळली होती. सोलापुरातील राष्ट्रवादी शरद पवार गटातील दिवंगत माजी महापौर महेश कोठे यांचे पुत्र प्रथमेश कोठे यांच्यासह पाच माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने माजी स्थायी समिती सभापती विनायक कोंड्याल, कुमुद अंकाराम, विठ्ठल कोटा आणि शशिकांत कंची या नेत्यांना आपल्या गटात घेतले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने केलेली ही संघटनात्मक मोहीम महाविकास आघाडीसाठी राजकीयदृष्ट्या धोकादायक ठरू शकते.

Khamgao APMC : माझी पत्नी परत द्या! कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणात धक्कादायक वळण

एकीकडे मित्रपक्षांकडून होणारे धक्के, तर दुसरीकडे भाजपने केलेले आक्रमक पक्षांतर या दोन्ही घडामोडींमुळे शरद पवार गटाची स्थानिक पातळीवरील पकड सैल होत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. नगरपालिका व नगर परिषद निवडणुकांपूर्वी राजकीय हालचाली वेगाने बदलत असून, महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद आणि महायुतीच्या आक्रमक धोरणामुळे महाराष्ट्रातील स्थानिक निवडणुकीची लढत अधिक चुरशीची होणार, हे या घटनाक्रमातून स्पष्ट होत आहे.

_______