pune-crime-sonali-hinge-police-suspension-extortion-case-principal : प्राचार्यांकडून सात लाखांची खंडणी उकळल्याचा आरोप
Pune: पुणे शहर पोलीस दलात मोठी खळबळ उडवणाऱ्या खंडणी प्रकरणात ‘रील स्टार’ म्हणून ओळखली जाणारी महिला पोलीस कर्मचारी सोनाली हिंगे हिच्यासह तिघा पोलिसांचे निलंबन करण्यात आले आहे. नामांकित महाविद्यालयाच्या प्राचार्यांना ब्लॅकमेल करून लाखो रुपयांची खंडणी उकळल्याचा गंभीर आरोप या तिघांवर ठेवण्यात आला आहे.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, पोलीस शिपाई सुदाम तायडे आणि दामिनी पथकातील सोनाली हिंगे यांचा समावेश आहे. कर्तव्यातील हलगर्जीपणा आणि बेजबाबदार वर्तन केल्याचा ठपका ठेवत विभागीय चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
Sanjay Kute : जबाबदाऱ्या वाढल्या; पण कुटेंना बळ की सत्तेपासून लांब ठेवले?
या प्रकरणाचा उलगडा अत्यंत धक्कादायक पद्धतीने झाला. एका महाविद्यालयातील अल्पवयीन विद्यार्थिनीची काही कागदपत्रे अडकल्याने तिने पोलिसांची मदत घेतली होती. मात्र, या तिघा पोलिसांनी याच परिस्थितीचा गैरफायदा घेत विद्यार्थिनीला सोबत घेत प्राचार्यांना जाब विचारण्यास सुरुवात केली. पुढे विद्यार्थिनीमार्फत प्राचार्यांविरोधात छळाची तक्रार देण्याचा दबाव टाकण्यात आल्याचा आरोप आहे.
तक्रारीची भीती दाखवत संबंधित पोलिसांनी प्राचार्यांना धमकावले. ‘प्रकरण गंभीर असून पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करू, अटक होईल आणि महाविद्यालयाची बदनामी होईल,’ अशी भीती निर्माण करून सुरुवातीला दहा लाख रुपयांची मागणी करण्यात आली. भीतीपोटी प्राचार्यांनी सात लाख रुपये दिल्याची माहिती समोर आली आहे. ही रक्कम तिघांनी आपापसांत वाटून घेतल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकाराबाबत विद्यार्थिनीला संशय आल्याने तिने पालकांना माहिती दिली. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली. चौकशीत हा प्रकार उघड झाल्यानंतर पुणे येथील बंडगार्डन पोलीस ठाण्यात या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी तत्काळ चौकशीचे आदेश दिले. प्राथमिक तपासात दोष स्पष्ट झाल्यानंतर कडक कारवाई करत संबंधितांना निलंबित करण्यात आले. गुन्हेगारांवर कारवाई करण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांनीच वर्दीचा गैरवापर करून खंडणी उकळल्यामुळे खाकी वर्दीवरील विश्वासाला धक्का बसला आहे. या घटनेमुळे पुणे पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाली असून, पुढील तपासात आणखी कोणते धक्कादायक तपशील समोर येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
__








