Sudhir Mungantiwar : मुनगंटीवार समर्थक संगीता खांडेकर यांचे नाव ‘चंद्रपूर महापौरपदासाठी’ प्रदेश भाजपकडून निश्चित

chandrapur-municipal-corporation-mayor-bjp-sangeeta-khandekar-mungantiwar : सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर भाजपचा डाव निर्णायक

Chandrapur: राज्यभरात २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांनंतर महापौर आणि उपमहापौर निवडीभोवती राजकारण रंगत असताना चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपने महत्त्वाचा आणि निर्णायक डाव टाकला आहे. माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने महापौरपदासाठी संगीता राजेंद्र खांडेकर यांचे नाव अधिकृतपणे निश्चित केले असून, यामुळे चंद्रपूरमधील सत्तासंघर्षाला नवे वळण मिळाले आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी ४ फेब्रुवारी २०२६ रोजी दिलेल्या अधिकृत पत्राद्वारे चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी श्रीमती संगीता खांडेकर यांच्या नावाची घोषणा केली आहे. हे पत्र विदर्भ विभागाचे संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर यांना पाठवण्यात आले असून, त्यामध्ये पुढील आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संगीता खांडेकर या आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या समर्थक म्हणून ओळखल्या जातात आणि भाजपच्या संघटनात्मक कामात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.

Sudhir Mungantiwar : सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून साकारलेल्या कॅन्सर रुग्णालयात महिनाभरात ८०० रुग्णांची तपासणी

चंद्रपूर शहराच्या सर्वांगीण विकासाचा सातत्यपूर्ण ध्यास घेत मुनगंटीवार यांनी गेल्या अनेक वर्षांत चंद्रपूर शहरासाठी ठोस विकासदृष्टी दिली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेत विकासाभिमुख, लोकाभिमुख आणि पारदर्शक कारभार अधिक बळकट होईल, असा विश्वास भाजपकडून व्यक्त करण्यात येत आहे. महापौरपदासाठी नाव निश्चित करून भाजपने सत्ता स्थापनेसाठी आपली भूमिका स्पष्ट केली असल्याचे चित्र आहे.

विशेष म्हणजे, चंद्रपूर महापालिकेत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. काँग्रेस पक्षाकडून महापौर आमचाच होणार, असे दावे केले जात असले तरी अंतर्गत गटबाजी आणि वर्चस्वाच्या संघर्षामुळे काँग्रेसमधील निवडून आलेले नगरसेवक सध्या सैरभैर झाले आहेत. दोन गटांमध्ये विभागलेल्या काँग्रेसमध्ये नगरसेवकांची स्वतंत्र नोंदणी, त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवणे, एकमेकांच्या गटातील नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न अशा घटना समोर आल्या आहेत. या प्रकारामुळे काँग्रेसमधील सत्तासंघर्षापेक्षा वर्चस्वाचा वाद अधिक तीव्र झाला असून, राज्यभर त्याची चर्चा सुरू आहे. दोन गटांच्या नोंदणीमुळे प्रशासकीय पातळीवरही पेच निर्माण झाल्याचे चित्र आहे.

Sudhir Mungantiwar : भुरसे कुटुंब गहिवरले, म्हणाले सुधीरभाऊ आपल्या सहकार्याबद्दल आमच्याकडे शब्द नाही..

या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर भाजपने मात्र शांतपणे आणि संयमाने परिस्थितीवर लक्ष ठेवत सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू ठेवल्या आहेत. भाजपचा विकासाचा अजेंडा आणि मुनगंटीवार यांचे नेतृत्व पाहता अनेक निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये चंद्रपूर महापालिकेत भाजपची सत्ता यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. काही काँग्रेस नगरसेवकांनीही विकासाच्या मुद्द्यावर भाजपला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

या सर्व राजकीय पार्श्वभूमीवर सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपूर महापालिकेतील सत्ता स्थापनेचे सूत्रधार ठरणार, असा विश्वास चंद्रपूरकरांमध्ये व्यक्त केला जात आहे. संगीता खांडेकर यांच्या नावाच्या अधिकृत घोषणेमुळे भाजपने आपला दावा मजबूत केला असून, आगामी महापौर निवडीत भाजपची बाजी लागणार का, याकडे संपूर्ण विदर्भासह राज्याचे लक्ष लागले आहे.

___