
development-based-Mungantiwar-Pattern-focus-education-health-employment-mission-olympic : जिल्हा नियोजनात ‘मिशन ऑलिम्पिक’सह पायाभूत सुविधांवर भर
Chandrapur : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिक्षण, क्रीडा, आरोग्य, पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, आदिवासी विकास आणि सार्वजनिक मालमत्तांच्या संरक्षणासह विविध महत्त्वाच्या विषयांवर ठोस व विकासकेंद्री भूमिका मांडली. जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीला गती देणारे अनेक महत्त्वपूर्ण ठराव त्यांनी समितीसमोर मांडत विकासाचा स्पष्ट अजेंडा ठेवला. त्यांच्या या भूमिकेमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील विकासकामांना नवी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
शिक्षण क्षेत्रात नगर परिषद, नगर पंचायत व महानगरपालिका शाळांसह अंगणवाड्यांसाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्याची मागणी मुनगंटीवार यांनी केली. “आदर्श शाळांसाठी मागील दोन वर्षांत दिलेल्या निधीचा आढावा घेऊन शाळांच्या इमारतींचा दर्जा तपासावा, शाळांचे ‘अ, ब, क’ श्रेणीत वर्गीकरण करावे आणि एकूण परिस्थितीवर श्वेतपत्रिका काढावी,” असे त्यांनी सुचविले. मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या का घटत आहे, यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच सर्व शाळांना बोलक्या संरक्षक भिंती बांधणे, दर्शनी भागावर राज्यगीत लावणे आणि मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे उभारण्याची मागणीही त्यांनी केली.
क्रीडा क्षेत्रात १५०० पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये कबड्डी व इतर देशी खेळांसाठी मॅटसारख्या साहित्याचे वितरण करण्यासाठी निधीची तरतूद करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला. आमदार निधीतून बिट स्तरावर २ लाख आणि तालुका स्तरावर ५ लाख रुपये क्रीडा स्पर्धांसाठी देण्याची सूचना केली. ‘मिशन ऑलिम्पिक’ अंतर्गत जिल्हा विकास निधीतून खेळाडूंना मदत देण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला. बल्लारपूर येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या धनुर्विद्या प्रबोधिनीसाठी मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेला ८.५ कोटींचा निधी त्वरित वितरित करण्याची मागणी त्यांनी केली.
सार्वजनिक बांधकाम विभागाने बल्लारपूर मतदारसंघातील रस्त्यांचा दर्जा वाढवून त्यांचे ओडीआर व एमडीआर मध्ये रूपांतर करण्याची सूचना त्यांनी केली. आरोग्य क्षेत्रात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी औषधांची तरतूद राज्य निधीतून करावी, तसेच लोहारा येथे ‘आयुष केंद्र’ सुरू करण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घ्यावा, अशी मागणी मुनगंटीवार यांनी केली.
नागिनाबाग येथील जिल्हा पशुवैद्यकीय चिकित्सालयाला ४.२६ कोटींच्या निधीद्वारे ‘राज्यातील मॉडेल चिकित्सालय’ म्हणून विकसित करण्याचा त्यांचा मानस आहे. आदिवासी विकासासाठी पोंभुर्णा व करंजी येथील एमआयडीसी पूर्णपणे आदिवासी समाजासाठी राखीव ठेवून ‘प्लग अँड प्ले’ संकल्पनेतून रोजगार निर्मिती करण्याची मागणी आमदार मुनगंटीवार यांनी तसेच वनविभागाच्या वन्यजीव नुकसान भरपाईची प्रक्रिया ३० दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
बैठकीला राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक वुईके, आमदार सर्वश्री देवराव भोंगळे , किशोर जोरगेवार, करण देवतळे,दूरदृश्य प्रणाली द्वारे खासदार नामदेव किरसान जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, मनपा आयुक्त अकनुरी नरेश, पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, जिल्हा नियोजन अधिकारी सुभाष कुमरे आदींची उपस्थिती होती.
धार्मिक स्थळे – लखमापूर येथील हनुमान मंदिर (ब वर्ग – ५ कोटी निधी), डोंगरहळदी मंदिर आणि नकोडा येथील समक्का-सारलक्का तीर्थस्थानाला ‘क’ वर्गाचा दर्जा देऊन विकास, पाणीपुरवठा योजनांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी जिल्हा निधीतून तरतूद आणि सोलर प्रकल्पांसाठी जागा भाड्याने घेऊन वीजबिलांचा प्रश्न मार्गी लावा, पुढील ५ वर्षांत राज्यात लागणाऱ्या झाडांमध्ये चंद्रपूर जिल्हा अग्रस्थानी राहावा, यासाठी वनविभागाने मुख्य रस्त्यांवर वृक्षलागवड करावी. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाने या सर्व मुद्द्यांवर सकारात्मक निर्णय घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.
__








