MLA Sudhir Mungantiwar inaugurated the Gram Panchayat Bhavan : आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले लोकार्पण
Chandrapur : पोंभूर्णा तालुक्यात फुटाणा येथे नव्याने बांधलेल्या ग्रामपंचायत भवनाचे लोकार्पण करण्यात आले. गावाच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने टाकलेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील ज्येष्ठ नागरिक आणि मातृसमान महिलांची मन:पूर्वक सेवा होईल, तसेच सुंदर व सुसज्ज कार्यालयातून उत्कृष्ट जनसेवा घडेल, असा विश्वास राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
फुटाणा येथे नव्याने उभारलेल्या ग्रामपंचायत भवनाचा लोकार्पण सोहळा आणि महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला भाजपा प्रदेश महामंत्री अल्का आत्राम, गटविकास अधिकारी विवेक बेल्लारवार, ग्रामसचिव प्रमोद सरकार, सरपंच संगीता तेलसे, उपसरपंच नैलेश चिंचोलकर, पोंभुर्णा तालुका महामंत्री हरिभाऊ ढवस, रवी मरपल्लीवार, विनोद देशमुख, अजय मस्के, रोशन ठेंगणे, राहूल पाल, वैशाली बोलमवार, संजय पुडके, चंद्रहास खोब्रागडे, राणी पाल, रोहिणी तेलसे, तृप्ती पाल, तानाबाई पुडके तसेच उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते व फुटाणा ग्रामवासी उपस्थित होते.
Sudhir Mungantiwar : घरकुलांसाठी रेतीची अडचण, महसूल मंत्र्यांसोबत बैठक घेणार !
आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, 90 वर्षांच्या एका वृद्ध महिलेने ग्रामपंचायत भवनासाठी आपली जागा विनामूल्य दिली. या माऊलीच्या त्यागामुळेच गावाला हे सुंदर आणि सुसज्ज ग्रामपंचायत भवन मिळाले आहे. फुटाणा ग्रामपंचायतीकडे येणाऱ्या रस्त्यासाठी आमदार निधीतून 20 लाख रुपयांचा निधी मंजूर केला जाईल. तसेच गावातील सिंचन, घरकुलासाठी लागणारी रेती आणि अन्य विकासाच्या अडचणी सोडविण्यासाठी स्वतः पुढाकार घेईल. गाव प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील आहे. पोंभुर्णा तालुक्याचे ही पाच वर्षे “न भूतो” अशी असणार आहेत.’
Sudhir Mungantiwar : गाव, गरीब और किसान, यह भाजप की है पहचान !
येत्या पाच वर्षांत पोंभुर्णा तालुक्यात एमआयडीसी प्रकल्प उभा राहत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. गावातील तरुण-तरुणींनी कौशल्य, मेहनत, परिश्रम व अभ्यासाच्या जोरावर या संधीचे सोने करावे, असे आवाहन त्यांनी केले.
संपूर्ण समाज सुसंस्कृत करण्याची जबाबदारी महिलांवर आहे. त्या कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत, फक्त संधीची गरज आहे. ‘या विभागाचा आमदार म्हणून मी जात-पात न पाहता केवळ विकासाच्या दृष्टीने कार्य करत आहे. गावाच्या विकासासाठी अनेक योजना आखण्यात येत आहेत. फुटाणा गावाला पोंभुर्णा तालुक्यातील आदर्श गाव बनवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन कार्य करण्याची गरज आहे,’ असेही आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले.