Sudhir Mungantiwar : चंद्रपूर महापालिकेत मुनगंटीवारांचा करिष्मा; पक्षशिस्त मोडणाऱ्या जोरगेवारांवर कारवाईचे संकेत

Signals of action against Kishor Jorgewar over violation of party discipline : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेनंतरच महापौरांचे नाव ठरले

Nagpur चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी इतिहास घडवला आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी १० मते कमी असतानाही त्यांनी भाजपचा महापौर बसवण्यात यश मिळवले असून, संगीता खांडेकर यांची महापौरपदी निवड झाली आहे. ही मोहीम यशस्वी केल्यानंतर मुनगंटीवार यांनी भाजपचे आमदार किशोर जोरगेवार यांच्यावर थेट निशाणा साधला. पक्षाची शिस्त मोडणाऱ्या आणि प्रदेशाध्यक्षांचा आदेश झुगारणाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई झाली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

“मी भाजपचा प्रदेशाध्यक्ष होतो. पक्षशिस्त मोडणे भाजप कधीच खपवून घेत नाही, त्यामुळे कारवाई ही निश्चितच होते. मग तो कार्यकर्ता असो वा कितीही मोठा नेता असो. ही कारवाई एक महिन्याच्या आत होते की वर्षभरानंतर, याचा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील; मात्र कारवाई नक्कीच होईल,” असा विश्वास मुनगंटीवार यांनी नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. संगीता खांडेकर यांचे नाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेनंतरच निश्चित करण्यात आले होते आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तसे अधिकृत पत्रही काढले होते. हा पक्षाचा अधिकृत आदेश असतानाही आमदार जोरगेवार यांनी आपल्या समर्थकाला महापौरपदासाठी अर्ज दाखल करायला लावला.

Chandrapur Municipal Corporation : भाजपची मोहीम यशस्वी, पण वंचितच्या जिल्हाध्यक्षाचा गेला बळी

काही त्रुटी निर्माण झाल्यास किंवा भाजप उमेदवाराचा अर्ज रद्द झाल्यास पर्याय म्हणून आपण अर्ज भरला, असा दावा जोरगेवार यांनी केला होता. त्यावर पलटवार करताना मुनगंटीवार म्हणाले की, “जर त्यांना अर्ज बाद होण्याची एवढीच भीती होती, तर त्यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज का दाखल केला नाही?” हा सर्व प्रकार गटबाजीचाच असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. विशेष म्हणजे, महापालिकेच्या भाजप उमेदवारांची यादी प्रदेशाध्यक्षांनी निश्चित केली होती, तरीही भाजपच्या शहराध्यक्षांनी त्यात परस्पर बदल केले. काही उमेदवारांची नावे कापून त्यात जोरगेवार यांच्या समर्थकांची नावे समाविष्ट केली. या गंभीर प्रकारामुळे प्रदेशाध्यक्षांनी चंद्रपूर शहराध्यक्षाची तातडीने हकालपट्टी केली आहे.

Chandrapur pattern in Parbhani : परभणीत ‘चंद्रपूर पॅटर्न’ची धास्ती; फूट रोखण्यासाठी काँग्रेस-उद्धवसेनेचे नगरसेवक सहलीवर!

चंद्रपूर महापालिकेत भाजपचे २३ तर काँग्रेसचे २७ नगरसेवक निवडून आले आहेत. संख्याबळ पाहता भाजपची सत्ता येणार नाही असेच सर्वांना वाटत होते. हे चित्र पाहून जोरगेवार यांनी महापौरपदावर दावा न करता गटनेतेपदाची मागणी पक्षाकडे केली होती. मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांनी महापौरपदाचा उमेदवार ठरवताना माझ्याशी चर्चा केली होती आणि निवडून आणण्याची जबाबदारी सोपवली होती, असेही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. चंद्रपूर भाजपमध्ये सुरू असलेली गटबाजी आता सर्वांच्या निदर्शनास आली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण याची निश्चित दखल घेऊन कारवाई करतील, असा पुनरुच्चार त्यांनी केला.