Sudhir Mungantiwar : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांना ‘भारतरत्न’ द्या !

sudhir-mungantiwar-demands-for-bharatratna-to-Vinayak-damodar-savarkar-maharashtra-budget-session : आ. सुधीर मुनगंटीवार यांचा विधानसभेत अशासकीय ठराव

Mumbai : देशाच्या स्वातंत्र्यासाठी अखंड लढा देत काळ्या पाण्याची शिक्षा भोगणारे आणि मातृभूमीच्या प्रेमाची जाज्वल्य ज्योत जनमानसात प्रज्वलित करणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ प्रदान करण्यात यावे, अशी ठाम मागणी राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत अशासकीय ठरावाद्वारे केली. सावरकरांचे राष्ट्रकार्य, त्याग, क्रांतिकारी विचार आणि समाजसुधारणेतील योगदान लक्षात घेता देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने त्यांचा गौरव करणे हे राष्ट्राचे कर्तव्य असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले.

सभागृहात बोलताना आ. मुनगंटीवार यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान बहुआयामी असल्याचे अधोरेखित केले. सशस्त्र क्रांतीची प्रेरणा देणारे, सामाजिक सुधारणांचे ध्येय बाळगणारे आणि राष्ट्रभक्तीची ज्योत पेटवणारे स्वातंत्र्यवीर सावरकर हे केवळ एक व्यक्तिमत्त्व नव्हते, तर ते एक विचारधारा होते, असे त्यांनी सांगितले. अंदमानच्या सेल्युलर जेलमधील अमानुष यातना, ५० वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा आणि राष्ट्रासाठी केलेला त्याग यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्थान भारतीय स्वातंत्र्य संग्रामात अद्वितीय असल्याचे त्यांनी नमूद केले.

Economic survey : महाराष्ट्राची अर्थव्यवस्था मजबूत, दरडोई उत्पन्नात देशात पाचवे स्थान

मराठी भाषेला समृद्ध करणाऱ्या अनेक संज्ञा आणि शब्द देण्याचे मोठे कार्यही स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केले, याची आठवण आ.मुनगंटीवार यांनी करून दिली. महानगरपालिका, महापौर, चित्रपट, दूरध्वनी, दिनांक अशा असंख्य मराठी शब्दसंपदेची भर त्यांनी घातली. त्याचप्रमाणे अस्पृश्यता निर्मूलन,आंतरजातीय विवाह यांसारख्या सामाजिक सुधारणांचे धाडसी विचार मांडून त्यांनी समाजाला नवी दिशा दिली, असे आ.मुनगंटीवार यांनी सांगितले.

सभागृहात बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील तेजस्वी आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी केवळ सशस्त्र क्रांतीची प्रेरणा दिली नाही, तर समाजातील अंधश्रद्धा, अस्पृश्यता आणि जातिभेद यांविरोधातही ठामपणे आवाज उठवला. अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये अमानुष यातना सहन करतानाही त्यांच्या मनातील राष्ट्रभक्तीची ज्योत कधीच विझली नाही. साहित्य, समाजसुधारणा, राष्ट्रवाद आणि क्रांतिकारी विचार यांचा संगम असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर हे खऱ्या अर्थाने आधुनिक भारताच्या विचारविश्वाला दिशा देणारे महापुरुष होते. अशा महान राष्ट्रनायकाला ‘भारतरत्न’ देऊन देशाने त्यांच्या त्याग आणि कर्तृत्वाचा गौरव करणे ही काळाची गरज असल्याचे आ.मुनगंटीवार यांनी ठामपणे सांगितले.

Nagpur municipal corporation : निधीसाठी कायम फडणवीस-गडकरींवर अवलंबून राहू नका; मावळत्या आयुक्तांचा मनपाला सल्ला

स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी व्यक्त केलेल्या गौरवपूर्ण मतांचा उल्लेख करताना आ.मुनगंटीवार म्हणाले की, सावरकरांविषयी देशातील अनेक विचारधारांमध्ये आदरभाव आहे. देशगौरव पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि महाराष्ट्रातील विविध पक्षांच्या नेत्यांनीही सावरकरांच्या कार्याचा गौरव केला आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेने एकमताने ठराव करून केंद्र सरकारकडे ‘भारतरत्न’ देण्याची शिफारस करावी, अशी आ. मुनगंटीवार यांनी मागणी केली.या ठरावाला आमदार विक्रम पाचपुते यांनी समर्थन देत सावरकरांचे राष्ट्रकार्यातील योगदान अमूल्य असल्याचे नमूद केले. त्यांनी आ. मुनगंटीवार यांनी मांडलेल्या ठरावाचे स्वागत करत पूर्ण पाठिंबा जाहीर केला.

मंत्री जयकुमार रावल यांनी उत्तर देताना स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी सर्वांच्याच मनात प्रचंड आदर असल्याचे सांगितले. या विषयावर सभागृहाच्या माध्यमातून शासकीय ठराव करून केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्यातून प्रेरणा घेत राष्ट्रहिताच्या दिशेने पुढे जाण्याचा संकल्प व्यक्त करत त्यांनी सभागृहात शासकीय ठराव आणण्यासाठी आश्वस्त केले.