व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Sudhir Mungantiwar : विरोधी गटाच्या नेत्याचा फोन अन् मुनगंटीवारांनी अयोध्येतून फिरवले चक्र;...

Sudhir Mungantiwar : विरोधी गटाच्या नेत्याचा फोन अन् मुनगंटीवारांनी अयोध्येतून फिरवले चक्र; पोलीस भरतीतील तांत्रिक अन्याय रोखण्याचे निर्देश

sudhir-mungantiwar-resolves-police-bharti-issue-nitesh-karale-call : अयोध्येतून पोलीस अधीक्षकांना दिल्या सूचना, शेकडो उमेदवारांना लागला प्रश्न मार्गी

Nagpur राजकीय मतभेदांच्या भिंती कितीही अभेद्य वाटल्या, तरी जनतेच्या वेदनेसमोर त्या क्षणात वितळून जातात; पक्षीय सीमारेषा कितीही आखल्या, तरी लोकहितासाठी त्या पुसल्या जातात याचे प्रभावी उदाहरण आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या एका कृतीतून पुन्हा अधोरेखित झाले.पोलीस भरतीतील उमेदवारांवर तांत्रिक अन्याय होत असल्याची बाब राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे राज्य प्रवक्ते नितेश कराळे यांनी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना सांगितली. विशेष म्हणजे, मुनगंटीवारांनी अयोध्येत असतानाही काही मिनिटांतच प्रशासकीय सूत्रे हलवत शेकडो उमेदवारांचा प्रश्न मार्गी लावला.

चंद्रपूर येथील पोलीस भरती प्रक्रियेत १०० मीटर धावण्याच्या चाचणीत तांत्रिक बिघाडामुळे गुणांचा घोळ होत असल्याच्या तक्रारी उमेदवारांनी केल्या होत्या. ही बाब नितेश कराळे यांनी फोनवरून सुधीर मुनगंटीवार यांच्या कानावर घातली. मुनगंटीवार सध्या अयोध्येत महत्त्वाच्या कामात व्यस्त आहेत, मात्र विषयाचे गांभीर्य ओळखून त्यांनी तिथूनच चंद्रपूरच्या पोलीस अधीक्षकांशी थेट संपर्क साधला.

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांनी दिला चंद्रपूरच्या विकासाचा ‘फाइव्ह इयर प्लॅन’!

“विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित हा संवेदनशील विषय आहे. कोणत्याही उमेदवारावर तांत्रिक कारणामुळे अन्याय होऊ नये. तात्काळ सेन्सरची तपासणी करा आणि पारदर्शक मोजमाप सुनिश्चित करा,” असे निर्देश मुनगंटीवारांनी तिथूनच प्रशासनाला दिले.

चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकीय पटावर सध्या काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासारखी नेते असतानाही, विरोधी गटात असलेले नितेश कराळे यांनी मदतीसाठी सुधीर मुनगंटीवारांचीच निवड केली.

Sudhir Mungantiwar : प्रदेशाध्यक्षांनी दिलेली यादी बदलण्याचा अधिकार जोरगेवारांना कुणी दिला?

मुनगंटीवार हे कायमच जात-पात, धर्म आणि राजकीय पक्षाच्या पलीकडे जाऊन ‘लोकनेता’ म्हणून सर्वसामान्यांसाठी तत्पर असतात, हेच या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले. विरोधी विचारधारेच्या नेत्यालाही जेव्हा न्यायाची अपेक्षा असते, तेव्हा मुनगंटीवार हेच नाव समोर येणे, हे त्यांच्या सर्वसमावेशक नेतृत्वाचे यश मानले जात आहे.

मुनगंटीवारांच्या या तत्परतेमुळे पोलीस भरतीतील पारदर्शकता टिकून राहणार असल्याने हवालदिल झालेल्या उमेदवारांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.

error: Content is protected !!