Sayaji Shinde directly questions government about felling of trees in Tapovan : तपोवनातील वृक्षतोडीवरून सयाजी शिंदेंचा सरकारला थेट सवाल
Nashik: नाशिकच्या आगामी कुंभमेळ्यासाठी तपोवन परिसरातील वृक्षतोडीचे सुरू असलेले काम थांबवण्याची मागणी आता जोर धरत असून या प्रश्नावर अभिनेते सयाजी शिंदे यांनी घेतलेली रोखठोक भूमिका राज्याच्या राजकीय वातावरणात मोठी खळबळ माजवणारी ठरली आहे. “मोठी झाडं तोडायची आणि नवीन झाडं लावायची हा पर्याय मुळातच चुकीचा आहे. काही माणसं मारायची आणि त्यांना मूल बक्षीस म्हणून द्यायचं असा न्याय कुठे असतो?” असा तीव्र सवाल सयाजी शिंदेंनी उपस्थित केला. निवडून दिलं म्हणून सर्व अधिकार तुमच्याकडे जमा झाले असा अर्थ होत नाही, सर्वसामान्यांच्या हिताचा विचार करणे ही लोकप्रतिनिध्यांची जबाबदारी आहे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
सयाजी शिंदे यांनी तपोवन परिसरातील आंदोलनकर्त्यांना समर्थन देत उपस्थिती लावत झाडांचे महत्त्व अधोरेखित केले. “उजाड माळरानावर झाडं लावायची असतील तर लावा. तिथे माती खरं तर चांगली नाही म्हणून झाडं नाहीत, मग जिथे हिरवाई टिकली आहे तिथेच झाडं तोडून विकास केल्याचं दाखवायचं ही पर्यावरणाशी केलेली अन्यायकारक तडजोड आहे. सगळी झाडं जगली पाहिजेत. पर्यावरणाचा आधी विचार आणि नंतर माणसांचा विचार हा योग्य क्रम आहे,” असे ते म्हणाले.
Meeting of MPs : महाराष्ट्रातील सर्व भाजप खासदारांची पंतप्रधान कार्यालयात तातडीची बैठक
साधूंवरील त्यांच्या जुन्या वक्तव्यावरून वाद उकरत वकील गुणरत्न सदावर्ते यांनी टीका केल्यानंतरही सयाजी शिंदे यांनी उत्तर देताना “आपण आपले बरे आहोत तिथे खरे. बाकी कोण काय बोलतात ते त्यांचे उत्तरदायित्व आहे,” असे सांगून वादात पडण्यास नकार दिला. दरम्यान तपोवनातील वृक्षतोडीच्या विरोधात कला क्षेत्रही मोठ्या संख्येने आंदोलनात उतरले असून अभिनेत्री अनिता दाते, अभिनेता चिन्मय उदगीरकर यांच्यासह अनेक नामांकित कलाकारांनी निषेध मोर्चा काढला.
“लहानपणापासून तपोवन पाहतेय, इथलं जंगल टिकलं पाहिजे,” असे अनिता दाते म्हणाल्या. “तपोवन वाचवा, तपोवन वाढवा हा आमचा नारा आहे,” असे चिन्मय उदगीरकर यांनी स्पष्ट केले. पर्यावरण संरक्षणाच्या मुद्द्यावर कलाकारांच्या एकत्रित उपस्थितीमुळे आंदोलनाला अधिक बळ मिळाले आहे.
Pawar family : पवार कुटुंबात कौटुंबिक कार्यक्रमातही भाऊबंदकी?
या मुद्द्यावर राजकीय वादही पेटलेला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सयाजी शिंदेंच्या भूमिकेला ट्विटरवरून पाठिंबा देत पर्यावरणाचं संवर्धन ही काळाची गरज असल्याचं म्हटलं आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही जण राजकीय हेतूने पर्यावरणवादी बनल्याची टीका केली असून कुंभमेळ्यात कोणतेही अडथळे येऊ दिले जाणार नाहीत, असा कठोर इशारा दिला आहे. पर्यावरण आणि विकास यांच्यातील संतुलनाचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे आणि तपोवनातील वृक्षतोड थांबवावी की काम पूर्ववत सुरू ठेवावे याबाबतचे निर्णय येत्या काही दिवसांत राज्य सरकारसमोर मोठे आव्हान ठरणार आहेत.
Local body election : जिल्हा परिषद निवडणुकांपूर्वीच महानगरपालिका निवडणुका?
तपोवनातील झाडांसाठी सुरू झालेले हे आंदोलन आता केवळ जंगल वाचवण्याची मोहीम न राहता लोकभावना, पर्यावरण, सांस्कृतिक वारसा आणि सत्तेच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह लावणारी सामाजिक चळवळ बनत चालली आहे. येत्या काही दिवसांत शासन कोणता तोडगा काढते याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
____








