Kalamb Taluka Villagers Terrorised by Goons in Dharashiv : १२० गावगुंडांवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
Dharashiv – Kalamb : धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील मोहा गावात गावठाण जमिनीतील स्मशानभूमीच्या वादाने दोन गटांमध्ये भीषण मारामारी झाली. इतर समाजांतील गावकऱ्यांनी आदिवासी पारधी समाजावर पोलिसांच्या उपस्थितीत हल्ला चढवला. अतिशय धक्कादायक म्हणजे महिलांना लाथा-बुक्क्यांनी आणि दगडफेक करून मारहाण करण्यात आली. या हल्ल्यानंतर मोहात गावबंदी करण्यात आली आहे आणि हिंसाचाराचा वणवा पेटला आहे.
पारधी समाजाच्या घरांची तोडफोड आणि दुचाकी व इतर जीवनावश्यक सामानाची जाळपोळ करण्यात आली. या हिंसाचारात अनेक जण गंभीर जखमी झाले. या घटनेची फिर्याद रमेश मक्कल काळे यांनी दिल्यानंतर कळंब पोलीस ठाण्यात १२० गावगुंडांवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (ॲट्रॉसिटी ॲक्ट) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही, असा आरोप पीडितांनी केला आहे.
Babanrao Taywade : राज्यघटनेनुसार कोणत्याही समाजाला आरक्षण देता येत नाही !
ही घटना २६ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास मोहा शिवारातील गट क्रमांक ५२९ मधील गावठाण जमिनीवर घडली. फिर्यादी रमेश मक्कल काळे (वय ५४) यांच्या यांनी सांगितल्यानुसार, ते आणि त्यांचे कुटुंबीय सुनील बापू काळे, बाबई शहाजी काळे, सोजर बाई बालाजी काळे, जिजाबाई गुलाब काळे गेल्या अनेक वर्षांपासून या जागेवर वास्तव्य करत आहेत. स्मशान दफनभूमीच्या जवळ असलेल्या या जागेवर बेकायदेशीररित्या गावगुंडांनी जमाव केला. आरोपी मयूर मडके यांनी पोलिसांना धक्का देऊन पारधी समाजाच्या एका महिलेवर हल्ला केला. तर संदीप मडके, गौतम, विजय अर्जुन मडके यांच्यासह १२० जणांच्या जमावाने पीडित कुटुंबाला जातीवाचक शिवीगाळ केली. “तुम्हाला येथे जागा मिळणार नाही,” असे म्हणत महिलांना आणि लहान मुलांना लाथा-बुक्क्यांनी तसेच दगडफेक करून बेदम मारहाण करण्यात आली.
Big criticism : ‘त्यांनी’ तुमचा गेम केला तुमच्या मुलाला पाडलं… तरीही !
या मारामारीत रमेश काळे आणि इतर महिलांसह लहान मुले-बाळे गंभीर जखमी झाली. इतकेच नव्हे, तर आरोपींनी रमेश काळे यांच्या मालकीची मोटरसायकल जाळून मोठे नुकसान केले. घटनेच्या दुसऱ्या दिवशी, २७ ऑगस्ट २०२५ रोजी रमेश काळे यांनी कळंब पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), १८९(२), १९१(२), १९०, ३२६(जी) आणि ॲट्रॉसिटी ॲक्ट कलम ३(१)(आर), ३(१)(एस), ३(२)(व्हीए) अंतर्गत गुन्हा दाखल केला. मात्र, पीडितांनी सांगितले की, पोलिसांनी अद्याप आरोपींवर कोणतीही कारवाई केलेली नाही.
या घटनेमुळे मोहा गावात तणावाचे वातावरण आहे. प्राथमिक माहितीनुसार, इतर समाजातील ग्रामस्थांनी पारधी समाजावर गावबंदी आणि सामुदायिक बहिष्कार टाकला आहे. पारधी समाजातील एकही महिला किंवा लहान मुलांना गावात व शाळेत प्रवेश दिला जात नाही. जीवनावश्यक वस्तूंसाठी दुकानदार किराणा किंवा रुग्णांना औषध विक्री करत नाहीत. “तुमचे लेकरं बार मेली तरी , आम्हाला काही फरक पडत नाही,” अशा भावना इतर समाजातील काही गावगुंडांनी व्यक्त केल्या आहेत, असा आरोप पीडितांनी केला. यामुळे संविधानिक अधिकारांचे उल्लंघन होत असल्याने प्रशासनाची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.