Farmers in trouble due to price hike of fertilizers and seeds : शिवसेनेची सरकारवर टीका; अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्याची मागणी
Buldhana खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर खते, बियाणे आणि शेतीसाठी आवश्यक सामग्रीच्या दरात झालेल्या प्रचंड वाढीमुळे राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. या प्रश्नावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रवक्त्या ॲड. जयश्री शेळके यांनी राज्य सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा विषय विधान परिषदेच्या पावसाळी अधिवेशनात प्रखरपणे मांडावा, अशी मागणी त्यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पूर्वी ६०० ते ७०० रुपयांत मिळणारी खते आता १७००-१८०० रुपयांवर पोहोचली आहेत. गेल्या वर्षी १४७० रुपयांना मिळणाऱ्या १०:२६ आणि १२:३२:१६ प्रकारातील खतांचे दर सध्या १७२० रुपये इतके झाले आहेत. दुसरीकडे, शेतमालाचे बाजारभाव कमी झाले आहेत. उत्पादन खर्चही निघत नाही, परिणामी शेतकरी पुन्हा कर्जबाजारीपणाच्या गर्तेत अडकतो आहे.
शासनाने १००% अनुदानावर हेक्टरी ७५ किलो बियाणे देण्याचे जाहीर केले होते. मात्र प्रत्यक्षात ‘महाबीज’मार्फत केवळ ६६ किलो बियाणेच वितरित होत असल्याचा आरोप ॲड. शेळके यांनी केला. ही बाब फसवणूक करणारी असून सरकारच्या घोषणा कागदापुरत्याच मर्यादित राहिल्या असल्याची टीकाही त्यांनी केली.
अनेक ठिकाणी शासकीय बियाणेदेखील निकृष्ट दर्जाचे व बोगस निघत असल्याचे प्रकार घडले असून, त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे आर्थिक संकट भोगावे लागत आहे. अशा बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यांवर तात्काळ कठोर कारवाई करावी, तसेच ज्यांचे बियाणे निकृष्ट निघाले आहे त्यांना मोफत बियाण्यांची भरपाई द्यावी, अशी स्पष्ट मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
Nagpur Fly-over : उद्घाटनापूर्वीच खचला उड्डाणपूल, अनर्थ टळला!
महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. पण सत्तेवर आल्यावर हे आश्वासन विसरले गेले असल्याचा आरोप शेळके यांनी केला आहे. “भारत कृषिप्रधान देश असूनही येथे शेतकरी उत्पादक न राहता ग्राहक बनतो आहे, ही शासनाच्या अपयशी धोरणांचीच परिणती आहे,” असे तीव्र शब्दांत त्यांनी म्हटले. या संपूर्ण पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या पावसाळी अधिवेशनात खालील मागण्यांवर चर्चा व्हावी, असे ॲड. शेळके यांनी स्पष्ट केले आहे.