Vidarbha Farmers : शेतकरी पुत्राची आत्महत्या; मेरा खुर्द येथील घटना

Farmer commits suicide due to debt burden : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून घेतला निर्णय

Buldhana सततची नापिकी आणि वाढते कर्ज या विवंचनेतून ३५ वर्षीय शेतकरी पुत्राने स्वतःच्या शेतात गोंधणीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना १९ डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मेरा खुर्द येथे घडली.

मृतकाचे नाव अनिल गंगाराम उदार (वय ३५) असे असून तो मेरा खुर्द येथील रहिवासी होता. गंगाराम हरीभाऊ उदार यांना दोन मुले असून ते कुटुंबासह एकत्र राहत होते. कुटुंबाकडे मेरा खुर्द शिवारातील गट क्रमांक २२१ मध्ये कोरडवाहू जमीन आहे. या जमिनीवर बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा मेरा खुर्द येथून ३१ हजार रुपयांचे पीक कर्ज घेण्यात आले होते. तसेच अनिल उदार याने बालाजी अर्बन चिखली पतसंस्थेकडून १ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते.

BMC Elections : मुंबईत एकच चर्चा, काय आहे MaMu फॅक्टर?

मात्र चालू वर्षी अपेक्षेप्रमाणे पीक न आल्याने कर्जाची परतफेड कशी करावी, या चिंतेने अनिल उदार सतत तणावात होता. घरची परिस्थिती अतिशय हालाखीची असल्याने कुटुंबीय मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होते. एकीकडे दारिद्र्य, तर दुसरीकडे बँक व पतसंस्थेचे कर्ज यामुळे तो मानसिक नैराश्यात गेला होता.

या नैराश्याच्या आहारी जाऊन १९ डिसेंबर रोजी सकाळी ‘शेतात जातो’ असे सांगून तो घरातून निघाला आणि शेतातील गोंधणीच्या झाडाला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. काही वेळाने भाऊ संजय उदार त्याला घरी परत आणण्यासाठी शेतात गेला असता, दुरूनच भावाने गळफास घेतल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्याने धावत जाऊन भावाला मिठी मारून खाली उतरवण्याचा प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत अनिल उदारचा मृत्यू झाला होता. हे दृश्य पाहून संजय उदार यांनी आक्रोश केला.

Local Body Elections : अकोला–बुलढाणा–वाशिममध्ये सत्तासमीकरणे बदलणार?

या घटनेची माहिती सरपंच रमेश अवचार व पोलीस पाटील संजय ठाकूर यांना देण्यात आली. त्यांनी तात्काळ अंढेरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार रुपेश शक्करगे यांना कळविले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचासमक्ष पंचनामा करून मर्ग दाखल केला आहे.

या घटनेमुळे घरातील कर्ता पुरुष गमावल्याने मृतकाचे आई-वडील, पत्नी, दोन मुले व भाऊ यांच्यावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला असून, संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.