व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home ताज्या बातम्या Vijay Wadettiwar : पाच लाख ऍडव्हान्स, भाजपने पळवले काँग्रेसचे 23 नगरसेवक, वडेट्टीवारांचा...

Vijay Wadettiwar : पाच लाख ऍडव्हान्स, भाजपने पळवले काँग्रेसचे 23 नगरसेवक, वडेट्टीवारांचा आरोप

BJP offered 5 lakhs to congress corporators, Vijay Wadettiwar claims : भाजपने लोकशाहीचा लिलाव मांडल्याची टीका

Nagpur सत्ता आणि पैशाच्या मस्तीत मग्रूर झालेल्या भाजपने महाराष्ट्रात लोकशाहीचा लिलाव मांडला आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. नागपूर येथे माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार यांनी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या राजकीय घोडेबाजारावरून महायुती सरकारवर सडकून टीका केली.

चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेसचे २३ नगरसेवक भाजपने प्रत्येकी ५ लाख रुपयांचा ॲडव्हान्स देऊन पळवल्याचा खळबळजनक दावा वडेट्टीवार यांनी केला असून, या सर्व विकल्या गेलेल्या लोकप्रतिनिधींवर ‘व्हीप’ जारी करून त्यांना अपात्र करण्याची कायदेशीर प्रक्रिया काँग्रेस पक्ष तातडीने सुरू करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे या मतदारसंघातून शिवानी वडेट्टीवर यांचे प्रयत्न सुरु आहेत. काँग्रेसमधील कोणच्या गटाचे नगरसेवक नॉट रिचेबल आहेत याचा शोध घेतल्या जात आहे. चंद्रपूर मध्ये खासदार प्रतिभा धानोरकर आणि वडेट्टीवर असे दोन गट सक्रिय आहेत.

Legislative Municipal council : महायुतीत ‘इनसाईड गेम’ची चर्चा; बाजोरिया पिता-पुत्रांभोवती राजकीय गणिते

ठेकेदारच भाजपचे आमदार झाल्याने पैशाची मस्ती कशी येते, हे चंद्रपूरमध्ये सुरू असलेल्या घोडेबाजारावरून दिसत असल्याचे सांगत वडेट्टीवार यांनी भाजपच्या सत्तेचा गैरवापर आणि भ्रष्टाचाराचा बुरखा टराटरा फाडला. काँग्रेसच्या नगरसेवकांना ५ लाख रुपये देऊन उचलण्यात आले असून, काँग्रेस जितके देईल त्याच्या डबल देऊ असे आमिष भाजपकडून दाखवले जात आहे, याचे सर्व रेकॉर्ड्स आणि पुरावे आपल्याकडे असून वेळ आल्यावर ते जनतेसमोर मांडू, असा इशारा त्यांनी दिला. राज्यात भाजपची सत्ता नसती, तर एकाही नगरसेवकाची पक्षांतर करण्याची हिंमत झाली नसती, असेही ते म्हणाले. दरम्यान, नागपूर विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्याच्या भाजपच्या भूमिकेवर बोलताना, जर निवडणूक बिनविरोध करायची असेल, तर केवळ एका जागेवर नाही, तर सर्वच्या सर्व जागांवर भाजपने चर्चा करावी, असे आव्हान त्यांनी दिले. आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षात वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या तीनही जिल्ह्यांतून उमेदवारांची नावे आली असून, पुढील एक-दोन दिवसांत महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार निश्चित केला जाईल, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

error: Content is protected !!